

मुंबई : गौरीशंकर घाळे
पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात नाराजांनी पुकारलेले बंड शमविण्यासाठी राबवलेल्या 'ऑपरेशन मनधरणी'नंतर आता भाजपने 'ऑपरेशन समर्थन' हाती घेतले आहे. पक्षनेतृत्वाच्या मनधरणीनंतरही उमेदवारी अर्ज मागे न घेतलेल्या बंडखोरांचे समर्थन मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपसह सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. भाजपमध्येही नाराजांनी मोठ्या प्रमाणावर बंडाचे निशाण फडकाविले होते. ही बंडखोरी शमविण्यासाठी भाजपने वरिष्ठ नेत्यांना पाठवून बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. काही ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजांशी संवाद साधून मनधरणी केली. परिणामी बहुतांश ठिकाणी बंडखोरांनी अर्ज मागे घेतले. मात्र, काही जण ठाम राहिले आहेत.
परिणामी, अनेक ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर पक्षात वर्षानुवर्षे काम केलेले पदाधिकारीच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. आता या बंडखोरांना अनौपचारीकरित्या निवडणुकीतून बाजूला करून भाजप उमेदवाराच्या प्रचारात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न 'ऑपरेशन समर्थन' अंतर्गत केला जाणार आहे.
महसूलमंत्री तथा भाजपचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही शेवटपर्यंत बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता माघारीचे सर्व पर्याय संपले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची नाराजी आणि राग स्वाभाविक आहे.
प्रत्येक इच्छुकाला तिकीट देणे शक्य नाही, आता झाले ते झाले विसरून, रिंगणात असलेल्या अधिकृत उमेदवारांचे समर्थन मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांची समजूत काढू, असे बावनकुळे म्हणाले.
बंडखोरांमुळे मतफुटीचा धोका
बंडखोर उमेदवारांमुळे होणारी संभाव्य मतफुटी टाळण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी बंडखोरांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यासाठी स्थानिक पातळीवरून प्रयत्न केले जाणार आहेत.