

बोईसर : बोईसर पूर्वेतील मान ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृतपणे उभारलेल्या गोदामात रासायनिक पिंप धुतल्याने त्यातून निघणारे दुषित पाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मान ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंह यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या बेकायदेशीर कृत्यामुळे भूगर्भजल, शेती तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मान ग्रामपंचायत हद्दीतील एका संबंधित उद्योगास एमपीसीबीकडून संमतीपत्र देण्यात आली आहे. तरी त्या संमतीतील अटींचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. तक्रारीनुसार औद्योगिक रासायनिक पिंप या ठिकाणी आणून धुतली जात असून, त्यातून निर्माण होणारे रासायनिक दुषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जात आहे.
या प्रकारामुळे परिसरातील पाण-ीप्रवाह, शेती तसेच भूगर्भातील जलस्त्र-ोत प्रदूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासोबतच औद्योगिक वापरासाठी बिनशेती नसलेल्या जमिनीवर अनधिकृत गोदामे उभारून औद्योगिक रासायनिक घनकचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा गोदामांना आग लागल्यास लगतच्या लोकवस्तींना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. शिवाय, अग्नीविरोधक यंत्रणा नसल्याने पर्यावरणीय तसेच आरोग्यविषयक धोके अधिकच वाढत असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर तत्कालीन आमदार श्रीनिवास वणगा यांनी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात अनधिकृत गोदामांच्या प्रश्नावर तारांकित प्रश्न क्रमांक ७७९८० उपस्थित केला होता. मात्र, हा प्रश्न जिल्हा प्रशासनाकडून अद्याप प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोपही या निमित्ताने पुढे आला आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांसह मान ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.