Madgad Fort Shrivardhan : श्रीवर्धन-वांजळे येथील ऐतिहासिक ‘मदगड’किल्‍ल्याच्या गर्भात दडलाय प्राचीन ठेवा

पुरातत्व विभागाच्या अनास्थेमुळे इतिहास नामशेष होण्याच्या मार्गावर; शासनाने दखल घेण्याची दुर्गप्रेमींची मागणी
Madgad Fort Shrivardhan
Madgad Fort Shrivardhanpudhari photo
Published on
Updated on

कापोली : श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे गावाच्या हद्दीत असलेला ऐतिहासिक ‘मदगड’ हा शिवकालीन इतिहास आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. मात्र, सध्या हा किल्ला आणि पायथ्याशी असलेले जागृत देवस्थान ‘आई वांजळाई देवी’ (नेमावरची देवी) प्रशासकीय अनास्थेमुळे तीव्र उपेक्षेचा सामना करत आहेत.

बोर्लीपंचतन शहरापासून दोन ते अडीच कि.मी. अंतरावर असलेल्या या किल्ल्याची शासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर या गडाचा गौरवशाली इतिहास कायमचा विस्मृतीत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

Madgad Fort Shrivardhan
Poladpur ST Bus Service : आंबेनळी घाटातून एस.टी. पुन्हा धावणार

आजही गडावर अनेक ऐतिहासिक खाणाखुणा स्पष्टपणे पाहायला मिळतात. ज्या संबंधित खात्याला दिसायला हव्यात! गाढल्या गेलेल्या पाण्याच्या टाक्यांचे अवशेष आजही गडाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात. दुर्ग अभ्यासकांच्या मते, जर शासनाने या गडाचे अधिकृत उत्खनन आणि संवर्धन मनावर घेतले, तर कदाचित गडाच्या गर्भातून अनेक प्राचीन वस्तू, किंवा युद्धकालीन अवशेष उजेडात येऊ शकतात.

हा केवळ एक डोंगर नसून इतिहासाचे एक जिवंत पान आहे, याची खात्री गडावरील काही अवशेष देतात. मात्र, यासाठी शासनाची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. विलोभनीय निसर्गसौंदर्य आणि गडावरून दिसणारा विहंगम नजराणा मदगड हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे.

गडाच्या माथ्यावरून आजूबाजूच्या परिसराचा अत्यंत विलोभनीय नजराणा पाहायला मिळतो. येथून सुवर्णगणेशाचे जगप्रसिद्ध दिवेआगर समुद्र, आई चिंचबादेवीचे बोर्लीपंचतन, तसेच शेजारीच असलेले कापोली आणि वडवली दक्षिणेकडील कार्ले खुजारे गावं दृष्टीपथात येतात.

Madgad Fort Shrivardhan
Mahad Road Condition : महाड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

एवढेच नव्हे तर, शिस्ते, खारशेत आणि भावे या तीन गावांचे श्रद्धास्थान असलेले कड्यावरील जाकमाता माऊली देवस्थान आणि तिचा प्रसिद्ध कडा, तसेच वडवलीचे ग्रामदैवत आई जांभूळकरीन या देवस्थानांचा परिसरही गडावरून अगदी स्पष्ट आणि नयनरम्य दिसतो.

ऐतिहासिक खुणा, पुरातन ठेव्याची शक्यता

हा किल्ला शिवकालीन असल्याचे मानले जाते, तर काही ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा वापर परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी एका टेहळणी बुरूज किंवा निरीक्षण चौकीसारखा केला जात असे.सध्याची स्थितीत हा किल्ला आता पूर्णपणे भग्न अवस्थेत असून तिथे मोठ्या वास्तू किंवा राजवाडे अस्तित्वात नसले तरी या गडावर वास्तूंचे काही पायथा, पाण्याच्या लहान टाक्यांचे अवशेष, विहीर आणि चुकून कुठे दगडातील कोरलेल्या पायऱ्या एवढेच अवशेष पहायला मिळतात.

दुर्गप्रेमींच्या श्रमातून गडाचे अस्तित्व शाबूत

सद्यस्थितीत हा गड झाडीझुडपे, काटेरी गवत आणि झाडांनी वेढला गेला असून गडावर जाण्यासाठी साधी वाटही शिल्लक राहिलेली नाही. पुरातत्व विभाग आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही ठोस कृती किंवा उपाययोजना करण्यात आलेली नाही. अशा स्थितीत इतिहास जपण्याच्या उद्देशाने दरवर्षी काही स्थानिक गडप्रेमी स्वतःहून पुढाकार घेतात. २० ते २५ दुर्गप्रेमी मावळ्यांना सोबत घेऊन हे तरुण गडावर जातात, झाडीझुडपे तोडून वाट शोधतात आणि गडाची स्वच्छता करतात. दुर्गप्रेमींच्या श्रमामुळेच गडाचे अस्तित्व टिकून आहे, मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.

स्थानिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार

या परिसराला ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित केल्यास वांजळे गावाचे महत्त्व प्रचंड वाढेल आणि ते पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र बनेल. शासनाने जर गडाकडे रस्ते, वीज, पाणी आणि पर्यटकांसाठी पायाभूत सुखसोयी उपलब्ध करून दिल्या, तर हा परिसर एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल. यामुळे स्थानिक तरुणांना व व्यावसायिकांना हक्काची रोजीरोटी मिळून परिसराचा कायापालट होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news