Mahad Road Condition : महाड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

गणपती सण तोंडावर; दरवर्षीप्रमाणे यंदाही खड्डयांतून प्रवास; चाकरमान्यांसमोर मोठे संकट
Mahad Road Condition
Mahad Road Conditionpudhari photo
Published on
Updated on

नाते : ईलयास ढोकले

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महाड तालुक्यातील अनेक गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था चाकरमान्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक रस्त्यांवर खड्डे, चिखल आणि खडबडीत मार्गामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे तसेच अन्य शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाकडे येतात. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांवर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, सध्या अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था पाहता गणेशभक्तांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत आहे. परिणामी दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.

Mahad Road Condition
Roha Ganeshotsav 2026 : रोहा तालुक्यातील श्रीगणेशाच्या आगमनाला पारंपरिक वाद्यांची साथ

गणपतीच्या मूर्ती घेऊन गावाकडे जाणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी असते. अशा परिस्थितीत खराब रस्त्यांमुळे वाहने खराब होण्यासोबतच अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे लक्षात न आल्याने परिस्थिती अधिक धोकादायक ठरू शकते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संबंधित ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी होणार की यंदाही चाकरमान्यांना खड्ड्यांतूनच गाव गाठावे लागणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

गावोगावी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असल्याने मुख्य रस्त्यांसोबतच गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी तात्पुरती सुरक्षा व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि रात्रीच्या वेळी आवश्यक प्रकाशव्यवस्था करावी.

Mahad Road Condition
Nanded Crime : कारवाईचा बडगा : नांदेड पोलिसांनी काढली जुगाऱ्यांची वरात

याशिवाय गणेशोत्सव संपल्यानंतर केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता अंतर्गत रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण आणि मजबुतीकरण करण्यासाठी ठोस आराखडा तयार करावा, अशीही मागणी आहे. संबंधित विभागांनी कामांची पाहणी करून त्यासाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवास मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, आता आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची गरज आहे.

प्रशासनाकडे नागरिकांच्या स्पष्ट मागण्या

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून गणपती आगमनापूर्वी खड्डे बुजवावेत आणि धोकादायक ठिकाणी रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी मुरूम टाकून रस्ते वाहतुकीयोग्य करावेत, अशी मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news