

Shiv Sena NCP dispute
महाड : नगरपरिषद निवडणुकीदरम्यान मंगळवारी (दि. २) मतदान केंद्र क्रमांक २ व ३ (शाळा क्रमांक ५) बाहेरील रस्त्यावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीच्या घटनेने तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. महाड तालुका आणि एमआयडीसी पोलिसांकडे नोंदवलेले गुन्हे पुढील तपासासाठी महाड शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष सुशांत जाभरे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत, युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यासह इतर आठ जण व एका अनोळखी व्यक्तीने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सदरच घटनेबाबत महाड एमआयडीसी पोलिसांकडे महेश निवृत्ती गोगावले यांनी दिलेल्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत (नाना) जगताप, प्रमुख गणेश जाभरे, इतर १० जण व ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दोन्ही तक्रारी रात्री उशिरा दाखल झाल्याची माहिती सकाळी पोलिसांकडून समोर आल्यानंतर, आज सकाळपासूनच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये या प्रकरणाबाबत चर्चेला ऊत आला आहे. पुढील तपास महाड शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश जांबरे (रा. टोळ बु.), हनुमंत मोतीराम जगताप, श्रीयश माणिक जगताप (रा. महाड), निलेश महाडीक (रा. किंजळोली), धनंजय उर्फ बंटी देशमुख, अमित शिगवण, व्यंकट मंडला, जगदिश पवार, गोपाल सिंग, मंजिदसिंग अरोरा, मोनिष पाल, समिर रेवाळे आदीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सुरज मालुसरे, सिद्धेश शेठ, व अन्य अज्ञात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.