

महाड : नगरपरिषद निवडणुकीत आज सकाळपासून महाड शहरातील शाळा क्रमांक पाच (प्रभाग क्र. २) येथे मतदान प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे.
सकाळी मतदानास सुरुवात होताच काही मिनिटांतच ईव्हीएम अचानक बंद पडली. त्यानंतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तत्काळ त्रुटी शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु समस्या सुटत नसल्याने मशीन बदलण्यात आली. मात्र काही वेळाने दुसरी मशीनही बंद पडली. तिसऱ्यांदा आणलेली मशीनदेखील काही वेळातच काम करेनाशी झाली.
मतदान प्रक्रियेत सतत खंड पडत असल्याने नागरिकांना बराच वेळ थांबावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नोकरदार वर्ग सकाळी लवकर मतदानासाठी आले होते; परंतु तांत्रिक बिघाडामुळे त्यांना परत जावे लागले किंवा तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नाही, प्रशासन योग्य प्रतिसाद देत नाही, अशी नाराजी व्यक्त केली. काही मतदारांनी रितसर हरकती नोंदवल्या, तर काहींनी संताप व्यक्त करत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.