

पोलादपूर : ग्रामीण भागात फिरताना अनेकदा अशी दृश्यं दिसतात जी आपल्याला वर्तमानापेक्षा भूतकाळात जास्त घेऊन जातात. समोर दिसणारं ते मातीचं घर, उतरतं छप्पर आणि कौलारू भिंती... हे फक्त दगड-मातीचं बांधकाम नाही, तर अनेक सुख-दुखांच्या प्रसंगांचं जिवंत स्मारक आहे. आज जरी या घरात शांतता पसरलेली असली, तरी विचार केला तर काळजाचा ठोका चुकतो. हेच ते घर असेल जिथे कधीकाळी नऊवारी साडी सावरत एक नवी नवरी उंबरठा ओलांडून आत आली असेल.
लहान मुलांच्या आवाजाने आणि त्यांच्या धावण्याने हे अंगण दुमदुमून गेले असेल. सणासुदीला पाहुण्यांची रांग आणि चुलीवरच्या जेवणाचा दरवळ संपूर्ण गल्लीत पसरत असेल. मात्र काळाच्या ओघात शहराची मोठ्या शहरीकरणामध्ये वाढ होऊ लागली. दळणवळण वेगाने होऊ लागले आणि शासन प्रशासनाने ग्रामीण भागाकडे झालेले दुर्लक्ष व नव्या शहराच्या निर्मितीसाठी केलेले विशेष प्रयत्न स्थळांतरात हातभार लावत ग्रामीण भागातील अनेक घराची कवाडे बंद होत आहेत तर जी काही उघडी आहेत ते थे फक्त आबालवृद्ध असतात.
कोकणात सगळे आहे तरी लोक बाहेर का जातात? हे फक्त स्थलांतर नाही तर चिंताजनक बाब म्हणावी लागले. प्रत्येक कोकणी घरात एक गोष्ट सामान्य आहे. घर कोकणात असते पण माणसे मुंबईत, पुण्यात किंवा परदेशात असतात. आपण सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे. काका मुंबईत, भाऊ पुण्यात, कुणीतरी परदेशात आणि गावात फक्त आई-वडील किंवा आजी-आजोबा राहतात. सणासुदीला घर भरतात, पण बाकी वर्षभर गाव शांत असतं. या सगळ्याचं एक साधं उत्तर आपण देतो गावात काम नाही, म्हणून लोक बाहेर जातात.
आजचा तरुण बदलला आहे. पूर्वी शेती ही जीवनपद्धती होती, आज ती जोखमीची वाटते. आजचा तरुण फक्त जगण्यासाठी नाही, तर चांगलं जगण्यासाठी विचार करतो. त्याला स्थिर उत्पन्न पाहिजे, आरामदायक जीवनशैली पाहिजे, प्रगतीची संधी पाहिजे. गावात त्याला संघर्ष दिसतो, शहरात संधी दिसते. त्यामुळे स्थलांतर ही निवड बनते.
आज कोकणात हजारो घरे बंद आहेत. काही अभ्यास आणि जनगणनेचे प्रवाह पाहिले, तर अनेक गावांमध्ये लोकसंख्या कमी होत चालली आहे. काही ठिकाणी शाळांमध्ये मुलांची संख्या कमी झाली आहे. घरं आहेत, जमीन आहे, संसाधनं आहेत पण लोक नाहीत. हे फक्त स्थलांतर नाही हा आर्थिक रचनेचा अपयश म्हणावे लागेल आहे. म्हणजेच अर्थव्यवस्था अशी बनवली गेली आहे की लोकांना बाहेर जाणं अधिक योग्य वाटतं.
ग्रामीण भागात मोठ्या उद्योगांची गरज नाही तर विखुरलेल्या लघुउद्योगांची गरज आहे. जिथे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री तिन्ही स्थानिक पातळीवर घडतात. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था, डिजिटल विक्री, ऑनलाईन बाजारपेठ यांचा वापर करून गावातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं. ग्रामीण भागातील घरे वर्षेभर उघडे दिसतीळ घराघरात नातेवाईक सखेसोयरे याचा राबता दिसून येईल अन्यथा गावच्या गाव ओस पडत ग्रामसंस्कृती लयास जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे .
विकासाचा समतोल साधणे आवश्यक
आजच्या काळात तंत्रज्ञान ही मोठी समतोल साधणारी शक्ती आहे ती शहर आणि गाव यांच्यातील अंतर कमी करू शकते. हे सर्व बदलण्याची शासनाची प्रशासनाची व अधिकारी वर्गाची ग्रामीण भागाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे .