

कोलाड : विश्वास निकम
दोन दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेल्या भातात पाणीच पाणी झाल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडासी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली असुन यामुळे बळीराजा पूर्णपणे संकटात सापडला आहे.या भिजलेल्या भातामुळे पेंढा ही वाया जाणार असल्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ही गंभीर बनला असुन अशी परिस्थिती पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.
दसरा झाल्यानंतर भात कापणीला सुरुवात केली जाते.परंतु काही दिवस पावसाची परिस्थिती पाहून 10 तारखेनंतर पडलेल्या लख्ख प्रकाशामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरवात केली.चार पाच दिवसात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात कापणी करून ठेवली.परंतु हवामानाच्या दिलेल्या अंदाजानुसार ऐन दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडणार असल्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले असल्याचे दिसून आले.
रायगड जिल्ह्यातील रोहा,व सुधागड तालुक्यातील असंख्य भागात बुधवार दि.15 ऑक्टोबर व गुरुवार दि.16 ऑक्टोबर 2025 रोजी सतत दोन दिवस पडत असलेल्या वादळवारा व तुफान पावसामुळे कापून ठेवलेल्या भातात पाणीच पाणी झाले असुन यामुळे धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यामुळे खरीपाच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत असुन शासनाने लवकरच लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
या अगोदर रब्बी हंगामातील भात लागवडीचे पुगांव, मुठवली, शिरवली, खांब, तसेच इतर काही भागात मे महिन्यात पडलेल्या पावसाने भातशेतीत पाणी साचून मोठे नुकसान झाले.काही भात पिक उभे असणारे कुजून गेले,तर काही शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके जमिनीवर लोळत वाहून त्या धानाची नासाडी झाली त्याचे तत्काल पंचनामे देखील वरीष्ठ पातळीवरून करण्यात आले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे केल्याचा प्रशासनानी दिलासा दिला मात्र त्याची नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही.
यानंतर रायगड जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुफान पडलेल्या पावसामुळे कापणीला आलेले उभे पिक शेतात जमीनदोस्त झाले व शासनाने याचे ही पंचनामे केले होते. परंतु अद्याप ही शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतेही भरपाई मिळाली नाही.याउलट काही दिवस असाच पाऊस बारसणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून मिळत आहेत.यामुळे हातातोंडांशी आलेल्या घास परतीच्या पाऊसामुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गुरांचा पेंढा ही वाया जाणार आहे.
आधुनिक काळात रासायनिक खते, नांगरणी, व भात लागवडीचा खर्च वाढला असुन ही याला न जुमनता शेतकरी वर्ग भात शेती करत असतो.परंतु निसर्गाच्या कोपामुळे सोन्यासारखी भात पिके मातीमोल झाली आहेत.यामुळे शासनाने भातशेतीचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
जिल्हयातील इतर तालुक्यातही परतीच्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अद्यापही पावसाची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. सध्या तयार भात पिक गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.
पुढील काही दिवस पावसाचा अंदाज
यानंतर रायगड जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तुफान पडलेल्या पावसामुळे कापणीला आलेले उभे पिक शेतात जमीनदोस्त झाले व शासनाने याचे ही पंचनामे केले होते. परंतु अद्याप ही शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतेही भरपाई मिळाली नाही. याउलट काही दिवस असाच पाऊस बरसणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून मिळत आहेत. यामुळे हातातोंडांशी आलेल्या घास परतीच्या पावसामुळे हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच गुरांचा पेंढाही वाया जाणार आहे.