

नाशिक : दिवाळीनिमित्त गृहिणींची घरपरिसर स्वच्छतेची लगबग सुरू झाल्याने शहरातून घंटागाड्यांद्वारे खतप्रकल्पावर वाहून नेण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात कचरा संकलनासाठी रात्रपाळीतही घंटागाड्या नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. प्रत्येक विभागामध्ये रात्रीच्या सुमारास चार ते सहा घंटागाड्या तसेच किमान सहा अतिरिक्त ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या माध्यमातून 405 घंटागाड्यांद्वारे शहरात केरकचरा संकलन केले जात आहे. या ठेक्यावर 350 कोटींचा खर्च केला जात आहे. या घंटागाड्यावर जीपीएस यंत्रणेद्वारे नियंत्रण असून, ठरवून दिलेल्या भागात घंटागाडी न गेल्यास दहा हजार रुपये प्रतिदिन दंडाचीही तरतूद आहे. मात्र, त्यानंतरही शहरात अनियमित घंटागाड्यांची तक्रार आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने गृहिणींकडून घर परिसराची स्वच्छता केली जाते. अडगळीतील साहित्य घराबाहेर काढत घंटागाड्यांमध्ये टाकले जाते. त्यामुळे शहरात केरकचरा संकलनात वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात कचऱ्याचे ढीग निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी महापालिकेने आता शहरातील सहाही विभागांमध्ये रात्रीच्या सुमारास चार ते सहा घंटागाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या आहेत. याव्यतिरिक्त सुका कचरा गोळा करण्यासाठी पाच ते सहा ट्रॅक्टर प्रत्येक विभागनिहाय सुरू केल्याची माहिती उपयुक्त अजित निकत यांनी दिली आहे.
कचरा 800 टनांवर जाण्याची शक्यता
घंटागाड्यांद्वारे शहरातून दररोज सुमारे 700 मे. टन कचरा संकलित करून खतप्रकल्पावर वाहून नेला जातो. दिवाळीत कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. आता पुढील काही दिवसांमध्ये दररोज सुमारे 800 मे. टन कचरा संकलित होण्याची शक्यता आहे.
दिवाळीनिमित्त शहरात कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने अतिरिक्त कचरा संकलनासाठी 24 घंटागाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या असून, जवळपास 36 ट्रॅक्टर अतिरिक्त उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अजित निकत, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन