

रोहा : नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आता रोहा तालुक्यातील राजकीय वातावरण जिल्हा परिषदेच्या व पंचायत समीतीच्या निवडणुकीमुळे चांगलेच तापले आहे.रायगड जिल्हयातील रोहा तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या 4 जागा आणि पंचायत समितिच्या 8 जागांसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक असल्याने मंगळवारी रोह्यात इच्छुकांची मोठी धावपळ पहायला मिळाली.या निवडणुकीत युतीः आघाडीबाबत सस्पेन्स असून, उमेदवारी माघारीनंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
आतापर्यंत रोहा तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समितीसाठी नऊ उमेदवारांची अर्ज दाखल झाले आहेत. मात्र बुधवारी 21 जानेवारी रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अर्जांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून मंगळवारपर्यत रोहा तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या 4 जागंसाठी आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहेय यात नागोठणे गटातून रोशन मारुती पाटील (शे.का.प), सुमित दत्तात्रेय काते(शिवसेना), नरेंद्र लक्ष्मण मोहिते(शिवसेना),भुवनेश्वर जि.प. गटातून संदेश सखाराम मोरे (शिवसेना), गणेश कृष्णा मढवी (शे. का.प ) तर घोसाळे जि. प. गटातून उर्वशी उद्देश वाडकर(शिवसेना), वैष्णवी हेमंत ठाकूर(शे. का. प ), रुपाली गणेश मढवी (शे.का.प ) तर पंचायत समितीसाठी नागोठणे गणातून कांचन दिपक माळी(शे.का.प),
भुवनेश्वर गणातून दर्शना समीर खरीवले (शे.का.प), खेळू दामा ढमाल(शे.का.प),न्हावे गणातून रुपाली गणेश मढवी (शे.का.प),वर्षा हेमंत देशमुख (शिवसेना), प्रगती हेमंत देशमुख (शिवसेना) घोसाळे गणातून शंकर सीताराम दिवकर (शेकाप ) विनायक शंकर धामणे (शे.का.प), मनोहर विठ्ठल गोरे (शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे बुधवारी उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर रोह्याचा हा राजकीय लढा रंजक होईल.
राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती सत्तेत असली, तरी रायगडच्या राजकीय मैदानात मात्र चित्र अद्याप धूसर आहे. रायगडमध्ये नक्की कोण कोणासोबत निवडणूक लढवणार, याबाबत इच्छुकांमध्ये मोठा संभ्रम दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमधील वादाच्या ठिणग्या अजूनही शमलेल्या नाहीत. त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र येणार की मैत्रीपूर्ण लढत होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.