

पालीः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुधागड तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, तालुक्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक नेतृत्व एकत्र येत ‘सुधागड तालुका सन्मान समिती’ (सुधागड विकास आघाडी) स्थापन करण्यात आल्याने तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सुधागड जिल्हा परिषद गटात बाहेरील व्यक्तीची उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने स्थानिक पातळीवर असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्याची अस्मिता, स्थानिक नेतृत्व आणि विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवत हा व्यापक युती प्रयोग साकारण्यात आला आहे.
या नव्या आघाडीत शिवसेना (शिंदे गट), शिवसेना ( ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, राजेश मपारा, श्रीराम प्रतिष्ठान ग्रुप तसेच विविध सामाजिक घटक सहभागी झाले आहेत. ही युती कोणत्याही एका पक्षाच्या नेतृत्वाखाली नसून, सर्व घटकांच्या सामूहिक निर्णयप्रक्रियेतून निवडणूक लढवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तालुक्यात जांभूळपाडा,राबगाव हे दोन जिल्हा परिषदेचे गट आहेत.तर जांभूळपाडा गटात जांभुळपाडा आणि परळी हे पंचायत समितीचे गण आहेत.
राबगाव जिल्हा परिषद गटात पंचायत समितीचा राबगाव गण आणि आडुळसे गण आहेत.या सर्व मतदार संघात आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या घडामोडींमुळे सुधागड तालुक्यातील पारंपरिक राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची दाट शक्यता असून, मतदारांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक नेतृत्वाला संधी, तालुक्याच्या अस्मितेचा सन्मान आणि विकासकेंद्रित राजकारण हेच या आघाडीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लवकरच सुधागड तालुका सन्मान समितीची अधिकृत घोषणा, उमेदवारांची अंतिम यादी तसेच प्रचाराचा सविस्तर आराखडा जाहीर होण्याची शक्यता असून, त्यामुळे सुधागडच्या राजकारणात ‘विकासाचा नवा अध्याय’ सुरू होणार असल्याचे चित्र आहे.