

महादेव सरसंबे
रोहे ः रोह्याची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या कुंडलिका नदी आता प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून कुंडलिका नदी संवर्धन करण्याची गरज आहे. परंतु लोकप्रतिनिधींचा जाणीवपूर्वक कुंडलिका नदीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक नद्यांपैकी बारमाही वाहणाऱ्या नद्यांमध्ये कुंडलिका नदीचं वरचा क्रमांक लागतो. बारमाही वाहणारी व स्वच्छ पाणी या नदीचे वैशिष्ट्य होते. रोहा तालुक्यातील सुतारवाडी ते न्हावे या परिसरातून पूर्वी ही नदी नागरिकांना जीवनदायी ठरत होती. गोफण पुढे कुंडलिका समुद्रात काही काही अंतरावर समाविष्ट होत असते.मानवी वस्त्यांसह पशु प्राण्यांना या नदीतील पाण्याचा उपयोग होत असत. त्यामुळे कुंडलिकेच्या तीरावर अनेक गावी वसलेले दिसत आहेत. या गावांना पूर्वी पिण्याचा पाण्याचा प्रश्न नदीमुळे भासत नव्हता.
बारमाही वाहणारी व स्वच्छ पाणी देणारी कुंडलिका नदी आज तिचे रूप बदललेले दिसून येत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातून येणाऱ्या सांडपाणी मुळे आधीच कुंडलिका नदी प्रदूषित झाली होती. नदीवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांचा उदरनिर्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहेच. तर नदीपात्राच्या किनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांची शेती नापीक झालेले दिसून येत आहे. या नदीच्या पात्रात अधून मधून सांडपाणी अनेक ग्रामपंचायतीसह नगर परिषदेच्या हद्दीतून सोडले जात आहे. स्वच्छ व निर्मळ म्हणून ओळख असलेल्या कुंडलिका नदीच्या पात्रात आज पाणी दूषित झाल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचरा व वाहनांची स्वच्छता नदीच्या पात्रात केली जाते. काही ठिकाणी मानवी मैला ही सोडण्याचा प्रकार अधून मधून घडल्याची दिसून आले.