

विजय चवरकर
पोयनाड ः अलिबाग तालुक्यातील पोयनाड मंडळ निरीक्षक कार्यालयात तलाठी उपलब्ध होत नाही. त्यामुळे कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
राज्यात शेतकरी संकटात आहे. जगण्यासाठी त्याचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे पण हे तलाठी सर्कल नोकरदाराच्या लक्षात येत नाही, तलाठी कार्यालयातील कामासाठी त्याला तलाठ्याची प्रतीक्षा करावी लागते असा प्रकार घडला आहे. पोयनाड मंडळ निरीक्षक कार्यालयात सकाळी सव्वानऊ ही कार्यालयीन वेळ असूनही साडेदहा वाजेपर्यंत एकही तलाठी कार्यालयात उपस्थित झाला नाही. या तलाठ्यांच्या प्रतीक्षेत शेतकरी उभे होते. आठ डिसेंबर रोजी तलाठ्यांची भेट घेण्यासाठी पोयनाड येथील मंडळ निरीक्षक कार्यालयात नऊ वाजून 30 मिनिटांनी गेले होते त्यावेळी कार्यालयात फक्त दोन कोतवाल हजर होते. पोयनाड मंडळ निरीक्षक कार्यालयात पोयनाड, शहापूर, ताडवागळे, पेझारी, आंबेपूर, शहाबाज, तलाठी सजाचे तलाठी बसतात परंतु साडेदहा वाजेपर्यंत एकही तलाठी कार्यालयात कामावर आला नाही. मंडळ निरीक्षकांची चौकशी केली असता ते तालुक्याला मिटींगला जाणार असल्याचे समजले.
आमचे प्रतिनिधी कार्यालयात गेले त्यावेळी आठ शेतकरी तलाठ्यांच्या भेटीला आले होते त्यामध्ये दोन महिला शेतकरी होत्या. आठ डिसेंबर रोजी सोमवार होता दर सोमवारी पोयनाडला आठवडा बाजार भरतो. शेतकरी आठवडाभराच्या कामातून सोमवारी पोयनाडला येतो कारण बाजारहाट होतं आणि तलाठ्यांची आवर्जून भेट अपेक्षित असते. सध्या कोकणात भात कापणी नंतर शेतकऱ्यांची आंबा बागेची साफसफाई, कडधान्य पेरणी भाजीपाला लागवड अशी कामे सुरू आहेत. भात पीक आर्थिक दृष्ट्या परवडत नाही त्यामुळे भाजी पिकवली तर पोयनाड विक्री करणे सोपे जाते.
तलाठी सर्कल वर्गाला शनिवार रविवार सुट्टी असते. पाच दिवस काम असे असताना शनिवार-रविवार सुट्टी भोगलेला तलाठी जो जनतेचा सेवक आहे तो सोमवारी वेळेवर कामावर का येत नाही असा जनतेचा सवाल आहे.
तलाठ्याने तलाठी सजामध्ये राहायला हवे असा आदेश आहे कारण नैसर्गिक आपत्ती काळात तिथली परिस्थिती व सरकार यांच्या मधला तलाठी हा महत्त्वाचा दुवा आहे. आठ डिसेंबर रोजी पोयनाड मंडळ निरीक्षक कार्यालयात जे शेतकरी तलाठ्याची वाट पाहत होते. त्यामध्ये एक गृहस्थ पुण्यावरून फेरफार काढण्यासाठी आले होते ते पेपर घेऊन त्यांना मुंबईस हायकोर्टात जायचे होते. दुसऱ्या शेतकऱ्याने त्याला फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद होता.