

पाली : वाकणपाली महामार्गाचे खड्डेमय रूप आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत करून बसले आहे. पावसाळ्यात पडलेले खड्डे ‘हवामान अनुकूल नाही’ या कारणावर सहा महिने लांबवून दिले आणि आता पावसाला दोन महिने उलटूनही एमएसआरडीसीकडून कोणतीही हालचाल नाही. रस्त्यावर खड्डेच खड्डे, वाहने डुलत, अपघात वाढत असताना विभाग थंडच आहे.
उंबरे, वाकण आणि पाली परिसरात रस्त्यांची परिस्थिती अक्षरशः भयावह झाली आहे. मोठमोठे खड्डे, तुटलेले तुकडे यामुळे प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात टाकणे दोनचाकीस्वारांसाठी तर हा मार्ग अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. पालीतील श्री बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या असंख्य भाविकांना रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे जबरदस्त त्रास होतोय तर रोज नोकरीला जाणारे कर्मचारी, विद्यार्थी व व्यावसायिक तर आणखी त्रस्त झालेत. ‘खड्डे चुकवू की मागचा ट्रक टाळू?’ असा प्रश्न प्रत्येक दुचाकीस्वाराला पडत आहे.
मंत्री, आमदार, खासदारांचा प्रवास ह्याच रस्त्यावरून होत आहे. याच रस्त्याने कोकणात जाणारे मंत्री, आमदार, खासदार आणि अनेक मान्यवर नेत्यांची रोजची ये-जा सुरू असते. त्यांच्यासाठी सरळ, सुसज्ज ताफे, विशेष सुरक्षा, शासकीय वाहतूक पण या खड्डेमय रस्त्यावरून ते रोज जात असतानाही दुरुस्तीचे आदेश देणे ही त्यांची जबाबदारी असूनही काहीच कृती होत नाही! ‘आमचे प्रतिनिधी रोज ह्याच रस्त्याने जातात. त्यांना खड्डे दिसत नाहीत का? किंवा सामान्य नागरिकांनी जखमी व्हावं, मगच का कामाला लागणार?’ कोकणच्या प्रवासासाठी व्हीआयपी मार्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या महामार्गाच्या दुर्दशेकडे राज्यकर्त्यांनी डोळे मिटले आहेत, हा सर्वात मोठा दुर्दैव असल्याची सडकून टीका जनतेतून होत आहे.
मनसेचा अल्टिमेटम
मनसे आता पूर्ण आक्रमक मोडमध्ये आली असून मनसे अध्यक्ष सुनील साठे यांनी एमएसआरडीसीला अंतिम इशारा दिला आहे. आठ दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले नाही तर ‘तीव्र रास्ता रोको करू” असा इशारा दिला आहे.
मनसेने तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी सांगितले की, ‘जनतेचा जीव धोक्यात आहे. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेला आम्ही आता उत्तर देऊ.’ वाहनांच्या दुरुस्तीवर लोक हजारो रुपये खर्च करत आहेत. काहींचे अपघात टळले, काहींचे थेट झाले. तरीही कामाचा कोणताही मागमूस नाही. फाईलवर मंजुरी, कागदावर काम दाखवण्यामुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
वाकणपाली महामार्गाची अवस्था हा केवळ रस्ता दुरुस्तीचा विषय नाही, ही जनतेच्या सुरक्षिततेची आणि राज्यकर्त्यांच्या उत्तरदायित्वाची मोठी कसोटी आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त, मनसे आक्रमक, अपघात वाढत आहेत आणि तरीही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मौन धारण करुन आहेत.