Khandeshwar News : खांदेश्वर स्थानकाजवळ अनर्थ टळला; बड्या बिल्डरच्या बांधकामामुळे रस्ता खचला

बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे सुरू असलेल्या पायलिंग कामादरम्यान अचानक फुटपाथ आणि रस्ता खचला.
Khandeshwar News
Khandeshwar News: खांदेश्वर स्थानकाजवळ अनर्थ टळला; बड्या बिल्डरच्या बांधकामामुळे रस्ता खचलाFile Photo
Published on
Updated on

Road and Footpath damaged due to construction work by a big builder near Khandeshwar station

विक्रम बाबर, पनवेल

पनवेल : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर सुरू असलेल्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पात मोठी दुर्घटना टळली आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे सुरू असलेल्या पायलिंग कामादरम्यान अचानक फुटपाथ आणि रस्ता खचला. या घटनेमुळे नागरिकांत मोठी खळबळ उडाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Khandeshwar News
Ajit Pawar | स्वर्गीय माणिकराव यांचे अपुरे कार्य स्नेहल जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

नामांकित बांधकाम कंपनीकडून खांदेश्वर स्थानकासमोर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी जमिनीत खोल खड्डा खणण्यासाठी पायलिंगचे काम सुरी आहे. मात्र, या दरम्यान योग्य खबरदारी न घेतल्यामुळे रस्ता आणि लगतचा पादचारी पथ खचला. सकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. भरदिवसा ही घटना घडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघात टळला असला तरी, या प्रकारामुळे बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणाचे गंभीर स्वरूप समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनी यावर संताप व्यक्त करत तातडीने काम थांबवण्याची मागणी केली. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करत बांधकाम व्यावसायिकाने काम थांबवण्याऐवजी उलट सुरूच ठेवले आहे, हे अधिक धक्कादायक आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवाशी खेळल्याचा आरोप संबंधित बांधकाम व्यावसायिकावर केला जात आहे.

Khandeshwar News
Raigad News | माथेरान पोस्टासाठी आता कर्जत ते माथेरान ड्रोनद्वारे टपालसेवा

या घटनेनंतर पालिका प्रशासन, पोलीस किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झालेला नाही. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही बांधकाम ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. फुटपाथ आणि रस्ता कोसळल्याने त्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

या प्रकरणात एक मोठा प्रश्न उभा राहतो – शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या अशा महत्त्वाच्या बांधकामांसाठी महापालिकेने दिलेल्या परवानग्यांमध्ये सुरक्षा उपायांबाबत कोणतीही स्पष्ट अट घालण्यात आली आहे की नाही? नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अपयश असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याची मागणी समाजसेवक राजकुमार पाटील आणि स्थानिक नागरिक यांनी केली आहे.

Khandeshwar News
Raigad : यंदा पावसाळ्यात 18 दिवस अरबी समुद्रात उसळणार 4.5 मीटर उंचीच्या लाटा

"आज अपघात टळला, पण उद्या कोणाचा जीव जाईल याची शाश्वती नाही," असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून बांधकाम थांबवावे, जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या घटनेबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news