Drone Postal Service
माथेरान : माथेरानमध्ये पोस्ट ऑफिस सेवा आता अधिक जलद होणार असून कर्जत हुन माथेरान करिता ड्रोन च्या मदतीने पार्सल सेवा सुरू केली जाणार असून त्याची यशस्वी चाचणी काल माथेरान मध्ये पार पडली, मात्र, संभाव्य परिस्थितीत रायगडमध्ये ड्रोन वापरावर बंदी असल्याने सरकारच्या निर्णयावर ड्रोन टपालसेवा अवलंबून असणार आहे.
माथेरानमध्ये हा दुर्गम पर्यटन स्थळ या विभागात मोडला जातो येथे शासकीय कर्मचाऱ्यांना सोईसुविधा पुरविण्याकरिता पायपीट करावी लागते. त्यात पोस्टल विभागाला त्याचा जास्त त्रास सहन करावा लागत असतो वाहन व्यवस्था नसल्याने सर्व पार्सलसेवा देण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करीत ओझे दोन ते तीन किमी अंतर वाहून न्यावे लागते त्यामुळेच ही सेवा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांचा भार हलका होणार असून नागरिकांना जलद सेवा उपलब्ध होणार आहे.
माथेरान मध्ये कोणतीही कुरिअर सेवा उपलब्ध नाही त्यामुळे ही सेवा माथेरान साठी संजीवनी ठरणार आहे. एकावेळी २० किलो वजन उचलण्याची क्षमता असलेल्या ह्या ड्रोन चे वजन ९:८ किलो आहे कर्जत ते माथेरान असा ह्या ड्रोनचा पल्ला असून हे अंतर कापण्यासाठी अवघा १५ मिनिट इतका वेळ घेतला. सायंकाळी चार वाजून ५२ मिनिटांनी कर्जत येथून ड्रोन माथेरान येथे उतरले पुन्हा पाच वाजून २७ मिनिटांनी कर्जत करता उड्डान केले, कर्जत येथील टेकडीवर असलेल्या ग्रीन व्यू हॉटेल येथून सुटलेले ड्रोन माथेरान येथील फन टाईम रेस्टॉरंट येथे हे ड्रोन उतरले. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर दूरसंचार च्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. सध्या रायगड जिल्ह्यात ड्रोन वापरास शासनाने बंदी घातली आहे परंतु या सेवे करिता शासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.