River water pollution : नद्यांच्या पाण्याची स्थिती

कारखान्यांमधील रसायने, थेट नदीत सोडली जातात. हे पाणी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते.
River water pollution
River water pollutionpudhari photo
Published on
Updated on

नूतन बांदेकर

मैदानी आणि पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता मानवी हस्तक्षेपामुळे वेगाने खालावत आहे. या भागात नद्यांच्या पाण्यात प्रदूषके सहज जमा होतात आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. पाण्यात नायट्रेट आणि फॉस्फेटचे प्रमाण वाढून शेवाळ वेगाने वाढते. याला 'युट्रोफिकेशन' असे म्हटले जाते. तसेच कारखान्यांमधील रसायने, थेट नदीत सोडली जातात. हे पाणी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते.

पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे संजीवन, पाणी म्हणजे अमृत आणि पाणी म्हणजे सबंध सजीव सृष्टीची निर्मिती! त्याचबरोबर ‘जल नही तो कल नही!’ हे ही आपण जाणतो. पाणी तयार करण्याची कला अजून तरी कुणाला अवगत झालेली नाही, तसंच कोणत्याही प्रयोगशाळेत अजूनही जल निर्मितीचा शोध लागलेला नाही. पाणी ही निसर्गाची निर्मिती आहे आणि मानवाला निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे. म्हणजेच जे पाणी आपल्याला मिळत आहे ते जपून वापरणं, थेंब अन थेंब वाचवणं हेच खऱ्या अर्थाने आपलं भविष्य जपणं होय. बँक बॅलन्स कितीही असला तरी शुद्ध हवा आणि पाण्याची जागा तो घेऊ शकणार नाही, म्हणूनच पैशांसारखं पाणी जपून वापरावं, हेच शहाणपण आहे.

River water pollution
Water Awareness | पाण्याचा आदर करायला शिका!

जगभरात गोड्या पाण्याचे सर्वात महत्त्वाचे स्रोत म्हणजे नद्या, तलाव आणि विहिरी. यामध्ये तलाव आणि विहिरी म्हणजे भूगर्भातील पाण्याचे साठे गरजेनुसार उपलब्ध करून घेणे होय. तर नद्या म्हणजे अखंड प्रवाहित असणारे जलस्त्रोत. उगमापासून ते सागराला मिळेपर्यंत नदीचा प्रवास हा कधी खडतर डोंगर दऱ्यांतून जलद गतीने तर कधी सपाट मैदानी प्रदेशातून संथ गतीने होणारा! हा प्रवास आपल्या दोन्ही काठावरील प्रदेश सुपीक आणि समृद्ध करत असतो.

अर्थात अश्मयुगीन मानावाने याच गोष्टींमुळे नद्यांच्या काठावर आपले बस्तान मांडले. शेती आणि इतर व्यवसाय उद्योगासाठी पूरक परिस्थिती, सुपीक जमीन आणि मुबलक पाणी यांचा जास्तीत जास्त वापर करून स्वतःची प्रगती केली. काळाच्या ओघात यंत्राचा शोध लागला, मोठमोठे कारखाने उभे राहिले.

River water pollution
Gandhari River Water Availability: पाणीटंचाईतही गांधारी ठरतेय ‌‘जीवनदायिनी‌’

रासायनिक द्रव्यांचा वापर करून भरघोस उत्पादने घेतली जाऊ लागली. पेट्रोलियमचा वापर करून वेगवान प्रवासाची साधने निर्माण झाली. रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर करून शेती केली जाऊ लागली. याच भागात शहरीकरणाला वेग आला. मात्र या सगळ्यातून सांडपाणी, टाकाऊ रासायनिक द्रव्ये, मातीत शोषली जाणारी रासायनिक खते, कीटकनाशके सारे काही कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रांत वाहात जाऊ लागले. दुर्दैव हेच की सपाट प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांनी जितकी सुख-समृद्धी काठावरच्या प्रदेशाला दिली, मानवाने तितक्याच किंबहुना अधिक प्रमाणात त्याच नद्यांना प्रदूषण दिले, याचा विचार केला तर माणूस किती कृतघ्न झाला आहे, हे लक्षात येते.

मैदानी आणि पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता मानवी हस्तक्षेपामुळे वेगाने खालावत आहे. या भागात नद्यांच्या पाण्यात प्रदूषके सहज जमा होतात व पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. पाण्यात नायट्रेट व फॉस्फेटचे प्रमाण वाढून शेवाळ वेगाने वाढते. याला 'युट्रोफिकेशन' असे म्हटले जाते. तसेच कारखान्यांमधील रसायने, रंग आणि जड धातू उदा. शिसे, क्रोमियम विनाप्रक्रिया थेट नदीत सोडले जातात. हे पाणी मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरते आणि जलचरांनाही मारक ठरते.

शहरांमधील सांडपाणी आणि कचरा यामुळे पाण्यात ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ वाढते, ज्यामुळे विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो आणि पाणी दूषित होते. पाण्याची गुणवत्ता ही पाण्याची भौतिक व रासायनिक स्थिती आणि जैविक घटक यावरून ठरते. पाण्याचा सामू, पाण्यातील क्षार, आणि जड धातू, तसेच जैविक घटक 'फिकल कॉलिफॉर्म'सारख्या जिवाणूंची पाण्यात उपस्थिती, जी पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा मुख्य निर्देशक असते. मात्र पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता या निकषांमध्ये अयशस्वी ठरते. ही गुणवत्ता सुधारल्यास काठावरच्या सजीवांना निर्धोक पाण्याचे वरदान मिळेल.

भारतातील गंगा, यमुना यासारख्या महत्त्वाच्या नद्या उत्तर भारताला मिळालेले वरदान आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर महाराष्ट्रातील कृष्णा, कोयना, पंचगंगा, गोदावरीसारख्या अनेक वरदायिनी आहेत. मात्र या नद्या जेथे सपाट भूप्रदेशातून वहात पुढे जातात, तिथे त्यांच्या काठावर मोठी शहरे वसलेली दिसतात, तसेच मोठमोठे कारखाने, उद्योगधंदे यांचे बस्तान बसलेले दिसते. या शहरांमधील लोकवस्ती वाढलेली दिसते. त्या संपूर्ण लोकवस्तीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून मगच ते नदीनाल्यांमध्ये सोडले जाणे गरजेचे आहे.

River water pollution
Sina River water crisis Solapur | सीना नदी पडली कोरडीठाक

कारखान्यांचे विषारी रसायनेयुक्त पाणी शुद्धीकरण करून बाहेर सोडले जाणे बंधनकारक आहे. सुपीक प्रदेशात शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात यातील काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे होतं ते फक्त नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण! हे प्रदूषण रोखण्यासाठी नदीकाठच्या औद्योगिक प्रदूषणाला आळा घालणे आवश्यक आहे. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट उभारून सांडपाण्यावर प्रक्रिया करून मगच नद्यांमध्ये सोडले जाणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news