Gandhari River Water Availability: पाणीटंचाईतही गांधारी ठरतेय ‌‘जीवनदायिनी‌’

स्थानिक कार्यकर्ते,तत्कालीन अभियंत्यांच्या प्रयत्नांना यश
Gandhari River Water Availability
Gandhari River Water AvailabilityPudhari
Published on
Updated on

इलियास ढोकले

नाते: राज्यातील अनेक भागांमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना रायगड विभागातील अनेक गावांसाठी मात्र गांधारी नदी जीवनदायिनी ठरत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या नदीला झालेले सिमेंट काँक्रीटचे बंधारे. कोथुर्डे धरणातील पाणीसाठा जवळपास संपुष्टात आला असतानाही मे महिन्याच्या अखेरपर्यंत गांधारी नदीपात्रात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Gandhari River Water Availability
Mumbai Goa Highway Bypass: माणगाव-इंदापूर बायपासची मुदत पुन्हा हुकली! खा. सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून बायपासला गती

रायगड विभागातील सुमारे 41 गावांना पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची पाणी योजना सध्या नियमित सुरू असून, ती गांधारी नदीतील उपलब्ध पाण्यावर अवलंबून आहे. राज्यातील अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असताना रायगड परिसरातील गावांमध्ये अद्याप अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कोथुर्डे धरणातील पाणी साठा कमी झाल्याने उन्हाळ्याच्या अखेरीस पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात होती. मात्र गांधारी नदीतील सातत्याने उपलब्ध राहिलेल्या पाण्यामुळे 41 गावांच्या पाणी योजनेला कोणताही मोठा अडथळा आलेला नाही. त्यामुळे हजारो नागरिकांना नियमित पाणी मिळत आहे.

Gandhari River Water Availability
Third Mumbai Project Raigad:तिसऱ्या मुंबई विरोधात 7 जून रोजी चिरनेर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा

स्थानिक नागरिकांच्या मते, गांधारी नदीचे संवर्धन आणि जलस्रोतांचे योग्य नियोजन यामुळे या भागात पाण्याची उपलब्धता टिकून राहिली आहे. तसेच भविष्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नदी संवर्धन, जलसंधारण आणि नवीन पाणी साठवण प्रकल्पांवर भर देण्याची गरजही व्यक्त होत आहे.

उन्हाळ्याच्या कठीण काळातही रायगड विभागातील अनेक गावांना सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याने हा भाग खऱ्या अर्थाने “सुजलाम सुफलाम” असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिक आणि तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत हीच परिस्थिती कायम राहिल्यास पाणीटंचाईचा मोठा धोका टळण्याची शक्यता आहे.

पाच वर्षांपूर्वी या विभागाचे तत्कालीन अभियंता श्री वडाळकर यांनी स्थानिक ग्रामस्थांकडून वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईची शहानिशा करताना या गांधारी नदीवर योग्य पद्धतीने सिमेंट बंधारे बांधले गेल्यास परिसरातील पाणीटंचाई भविष्यकाळात कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होईल असे सांगून आपल्या विभागामार्फत या ठिकाणी सुमारे चार कोटी रुपयांच्या खर्चाचा तपशील देत आठ ते नऊ ठिकाणी हे बंधारे बांधावेत असे सुचित केले होते.

आज पाच वर्षानंतर श्री वडाळकर सेवानिवृत्त झाले असले तरीही त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून केलेली कल्पना भविष्यकाळात कायमस्वरूपी या विभागाला पाणीटंचाईतून मुक्त करणारी ठरणार आहे. याबद्दल परिसरातील नागरिक व या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जनता धन्यवाद येत आहे.

सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांमुळे वाढला पाणीसाठा

नदीपात्रात उभारण्यात आलेले “मृदू व जलसंधारण विभागामार्फत“ बांधलेले सिमेंट काँक्रीट बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडवले जात असून भूजल पातळी वाढण्यास मदत होत आहे. उन्हाळ्यातही नदीत पाणी टिकून राहत असल्याने गावांच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी व ग्रामस्थांनी या बंधाऱ्यांचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news