

डॉ. राजेंद्र सिंह, जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ
आजचे आधुनिक अभियंते आणि जागतिक बँक ज्या प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांची रचना करतात, ते निसर्गाच्या सिद्धांताला धरून नाहीत. आधुनिक विज्ञानाने पाण्याच्या केवळ भूपृष्ठावरील प्रवाहाचा विचार केला. नदीवर मोठे धरण बांधून पाणी अडवणे आणि ते पाईपलाईनद्वारे दूरवर नेणे, याला त्यांनी प्रगती मानले; परंतु या प्रक्रियेत नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट झाला आणि नद्या मृत झाल्या. याउलट, आपल्या पूर्वजांचे ज्ञान हे भूगर्भातील प्रवाहाचा विचार करणारे होते. आधुनिक तंत्रज्ञानाने पाण्याच्या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी केली; पण कायमस्वरूपी उपाय दिला नाही. आपण जमिनीच्या आतल्या पाण्याच्या साठ्यांचे पुनरुज्जीवन करत नाही, तोपर्यंत केवळ धरणांमधील पाण्यावर आपण जगू शकत नाही.
आज संपूर्ण जग हवामान बदलाच्या अभूतपूर्व संकटातून जात आहे. एका बाजूला भीषण दुष्काळ, तर दुसर्या बाजूला अचानक होणारी अतिवृष्टी असे टोकाचे बदल अनुभवास येत आहेत. माणसाने निसर्गाच्या चक्रात केलेला हस्तक्षेप हे यामागचे मुख्य कारण दिसून येते. आपण नद्यांना केवळ पाण्याचे वाहते नाले समजण्याची चूक केली आणि तिथूनच आपल्या विनाशाचा प्रवास सुरू झाला. निसर्गाशी नाते जोडल्याशिवाय आणि पारंपरिक ज्ञानाचा आदर केल्याशिवाय आपण या संकटाून बाहेर पडू शकत नाही, हा माझ्या आजवरच्या प्रवासाचा सर्वात मोठा धडा आहे.
मी काही वर्षांपूर्वी राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील गावांमध्ये गेलो, तेव्हा तेथे भीषण परिस्थिती होती. भूजल पातळी शेकडो फूट खाली गेली होती, विहिरी कोरड्या ठाक पडल्या होत्या आणि गावांमधील तरुण रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतरित होत होते. गावांमध्ये केवळ वृद्ध आणि लहान मुले राहिली होती. तीही कुपोषणाचा सामना करत होती. मी सुरुवातीला तिथे एक डॉक्टर म्हणून आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांवर उपचार करण्यासाठी गेलो होतो; पण तिथल्या एका वयस्कर गावकर्याने माझे डोळे उघडले. त्यांनी मला सांगितले की, आम्हाला औषधांची नव्हे, पाण्याची गरज आहे. जमीन निरोगी असेल, तर आम्ही निरोगी राहू. पाशवी कोरडेपणा दूर करणे हेच खरे औषध आहे. त्यांनी मला विहिरींच्या पोटात उतरवून जमीन पाण्यासाठी कशाप्रकारे आसुसलेली आहे, हे दाखवले. तिथून माझ्या जलसाधनेचा खरा प्रवास सुरू झाला.
पाण्याचे संवर्धन करताना आपण आधुनिक अभियांत्रिकीच्या नावाखाली निसर्गाचा पराभव करण्याचा प्रयत्न करतो, जे पूर्णपणे चुकीचे आहे. राजस्थानसारख्या अत्यंत उष्ण प्रदेशात सूर्य हा पाण्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. पडणारा पाऊस आपण भूपृष्ठावरच ठेवला, तर कडक उन्हामुळे त्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्याचे संवर्धन अशा पद्धतीने करायला हवे की, ते पाणी थेट पृथ्वीच्या पोटात म्हणजेच भूगर्भातील जलकुंभांमध्ये (अॅक्युफर्स) उतरेल. तिथे सूर्यकिरणांमुळे होणार्या बाष्पीभवनाचा धोका राहत नाही. आम्ही गावकर्यांच्या मदतीने माती आणि दगडांचे अर्धचंद्राकृती छोटे बंधारे बांधायला सुरुवात केली. त्यांना पारंपरिक भाषेत ‘जोहड’ म्हटले जाते. हे जोहड अतिशय साधे पण विज्ञानावर आधारित होते. पावसाचे वाहून जाणारे पाणी या जोहडमध्ये थांबायचे आणि हळूहळू पाझरून थेट जमिनीच्या आत मुरायचे. यामुळे भूजल पातळी वाढू लागली आणि चमत्कार म्हणजे ज्या नद्या अनेक दशकांपासून मृत झाल्या होत्या, त्या पुन्हा बारमाही वाहू लागल्या.
या प्रयोगावरून एक गोष्ट निश्चितपणाने सांगता येईल की, पाण्याचे व्यवस्थापन हे कधीही केंद्रीकृत असू शकत नाही. सरकारी योजना किंवा मोठ्या धरणांच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकत नाही. पूर्णपणे स्थानिक समुदायाच्या हातात असणारे विकेंद्रित जलव्यवस्थापन हाच यशस्वी मार्ग आहे. शेतातील पाणी शेतात आणि गावातील पाणी गावात थांबले पाहिजे, हाच आपला मूलमंत्र राहिला पाहिजे. एखादे गाव स्वतःच्या पाण्याचे नियोजन स्वतः करते, तेव्हा त्या गावामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण होतो, हे आम्ही पाहिले आहे. पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे शेती पुन्हा बहरू लागली, रोजगार निर्माण झाला आणि शहरांकडे जाणारे स्थलांतर थांबले. ज्या लोकांनी शहरांमध्ये मजुरीसाठी गाव सोडले होते, ते पुन्हा आपल्या मातृभूमीत परतले आणि ताठ मानेने शेती करू लागले. जलस्वावलंबनाशिवाय कोणतीही आत्मनिर्भरता येऊ शकत नाही. आपली गावे जलसमृद्ध आणि स्वयंपूर्ण होतील तेव्हाच देशाची प्रजासत्ताक व्यवस्था मजबूत होईल.
जलसंधारणाचा परिणाम केवळ पाण्याच्या उपलब्धतेपुरता मर्यादित नसून तो स्थानिक हवामानावरही (मायक्रो क्लायमेट) अत्यंत सकारात्मक प्रभाव पाडतो. पूर्वी अरबी समुद्रावरून पावसाचे ढग राजस्थानच्या या भागावरून जायचे, तेव्हा वनस्पतींचा अभाव आणि खाणींमधून निघणारी उष्णता यांमुळे ढगांचे सांद्रीभवन होत नव्हते आणि पाऊस न पडताच ढग निघून जायचे; पण जोहडच्या माध्यमातून जमीन ओली झाली, झाडे वाढली आणि हिरवळ निर्माण झाली, तेव्हा हवेतील आर्द्रता वाढली. आता हे स्थानिक ढग समुद्रावरून येणार्या ढगांना आकर्षित करतात आणि तिथे चांगला पाऊस पडतो. म्हणजेच, माणसाने प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तर तो निसर्गाचे चक्र पुन्हा पूर्वपदावर आणू शकतो. आम्ही आजवर हजारो गावांमध्ये ११ हजारांहून अधिक जलसंरचना तयार केल्या आहेत. त्यातून अनेक नद्या जिवंत झाल्या आहेत. हा बदल केवळ कायद्याने किंवा निधीने झालेला नाही, तर तो लोकांच्या श्रमातून आणि निसर्गाप्रति असलेल्या आदरातून निर्माण झाला आहे.
आज आपल्या शहरांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. शहरांमधील सुशिक्षित तरुण आणि नागरिक स्वतःला निसर्गापेक्षा वेगळे समजतात. त्यांना असे वाटते की, नळ चालू केला की, पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे; पण ते पाणी कुठून येते, याचा विचार कोणीही करत नाही. शहरांमध्ये येणारे पाणी हे ग्रामीण भागातील नद्यांमधून आणि स्त्रोतांमधून खेचून आणले जाते. शहरांमध्ये पाण्याचा अनिर्बंध अपव्यय करताना आपण ग्रामीण भागातील पाणी पळवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे. शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर जलसाक्षरता मोहिमेची गरज आहे. सांडपाणी आणि पावसाचे स्वच्छ पाणी एकत्र करून आपण आपल्या नद्या आणि तलाव प्रदूषित करत आहोत. आपण पाण्याचा आदर करायला शिकले पाहिजे. पाशवी विकासाच्या नावाखाली निसर्गाचा र्हास करत आहोत. जो विकास विस्थापन आणि आपत्ती घेऊन येतो, त्याला विकास म्हणता येणार नाही.
पुढील महायुद्ध हे पाण्यासाठी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. आपल्याला हे संकट टाळायचे असेल, तर जगाला पुन्हा एकदा पारंपरिक निसर्गस्नेही जीवनशैलीकडे वळावे लागेल. पावसाच्या पॅटर्ननुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसारच पिकांची निवड आणि उद्योगांचे नियोजन केले पाहिजे. निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करून आपण कधीही समृद्ध होऊ शकत नाही. तरुण पिढीने विशेषतः तंत्रज्ञानाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर निसर्गाचा नाश करण्यासाठी नाही, तर निसर्गाला पूरक ठरण्यासाठी करायला हवा. पाण्याचा केवळ उपभोग घेण्याची वस्तू म्हणून विचार करू नकातुम्ही पाण्याचा आदर कराल, तेव्हा निसर्गाकडूनही तुम्हाला भरभरून मिळेल. पाणी हाच आपला भविष्यकाळ आहे. आपल्याला प्रत्येक थेंब जमिनीच्या उदरात जिरवावा लागेल.
आजचे आधुनिक अभियंते आणि जागतिक बँक (वर्ल्ड बँक) ज्या प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांची रचना करतात, ते निसर्गाच्या सिद्धांताला धरून नाही. आधुनिक विज्ञानाने पाण्याच्या केवळ भूपृष्ठावरील प्रवाहाचा (सर्फेस फ्लो) विचार केला. नदीवर मोठे धरण बांधून पाणी अडवणे आणि ते पाईपलाईनद्वारे दूरवर नेणे, याला त्यांनी प्रगती मानले; परंतु या प्रक्रियेत नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट झाला आणि नद्या मृत झाल्या. याउलट, आपल्या पूर्वजांचे ज्ञान हे भूगर्भातील प्रवाहाचा (सबसर्फेस फ्लो) विचार करणारे होते. आपण भूगर्भातील पाण्याच्या साठ्यांचे पुनरुज्जीवन करत नाही, तोपर्यंत केवळ धरणांमधील पाण्यावर आपण जगू शकत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाने पाण्याच्या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी केली; पण कायमस्वरूपी उपाय दिला नाही.
पाण्याचे संकट हे केवळ पर्यावरणाचे संकट नाही, तर ते मानवी हक्कांचे आणि सामाजिक सुरक्षिततेचे संकट आहे. जेव्हा एखादा प्रदेश पूर्णपणे कोरडा पडतो आणि तेथे पिण्याच्या पाण्याचा थेंबही उरत नाही, तेव्हा तिथली माणसे विस्थापित होतात. आज जगासमोर ‘क्लायमेट रिफ्युजीज’ म्हणजेच हवामान बदलामुळे विस्थापित झालेले लोक हे सर्वात मोठे संकट आहे. राजस्थानमधील गावागावांतून तरुण जेव्हा दिल्ली, मुंबई किंवा अहमदाबादसारख्या शहरांमध्ये मजुरीसाठी जात होते, तेव्हा ते स्वतःची जमीन आणि स्वाभिमान गमावून तिथे झोपडपट्ट्यांमध्ये नरकयातना भोगत होते. आम्ही नद्यांचे पुनरुज्जीवन केले तेव्हा स्थलांतराचा कल थांबला आणि शहरांवरील ताण कमी झाला. आज संपूर्ण जगात पाण्याचे ज्या पद्धतीने व्यापारीकरण सुरू आहे, तेही अत्यंत घातक आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या जमिनीतील पाणी मोफत उपसून ते बाटल्यांमध्ये बंद करून महागड्या दराने विकत आहेत. वस्तुतः पाणी ही निसर्गाची देणगी असल्याने ती कोणाची खासगी मालमत्ता असूच शकत नाही. आपण पाण्याचा अधिकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातात दिला, तर गरिबांना जगण्याचा अधिकार नाकारल्यासारखे होईल. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना त्याचा वापर, संवर्धन यांबाबतच्या नियमांबरोबरच सामाजिक निकषही विचारात घेणे गरजेचे आहे.
आम्ही जेव्हा अरवरी आणि इतर नद्या पुनरुज्जीवित केल्या, तेव्हा त्या पाण्याचे रक्षण करण्यासाठी गावकर्यांची एकत्र ‘नदी संसद’ स्थापन केली. या संसदेत गावातील लोक एकत्र बसून नदीतील पाण्याचा वापर कसा करायचा, कोणत्या पिकांची लागवड करायची आणि पाण्याचा अपव्यय कसा रोखायचा याचा निर्णय घेत. नदी संसद ही लोकशाहीचे सर्वात शुद्ध आणि जमिनीवरचे रूप आहे. जोपर्यंत पाणी वाचवण्याच्या प्रक्रियेत आणि त्याच्या वापरात स्थानिक समाजाचा थेट सहभाग आणि अधिकार असणार नाही, तोपर्यंत कोणतेही जलसंधारण दीर्घकाळ टिकू शकत नाही.