Rice Farming Crisis: कोकणातील 'भाताचे कोठार' अडचणीत; भाताच्या उत्पादनाचे कोलमडलेले अर्थकारण

सामाजिक बदल आणि भविष्यातील उपाय
Rice Farming Crisis
Rice Farming CrisisPudhari
Published on
Updated on

जयंत धुळप

रायगड: कोकणातील भातशेतीचे गणित बिघडण्यामागे केवळ निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत नसून, उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारा बाजारभाव यांमधील विसंगती हे सर्वात मोठे आर्थिक कारण ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे केल्या जाणाऱ्या नांगरणीचा खर्च ३० ते ४० टक्क्याने वाढला आहे.

रासायनिक खते, कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च गगनाला भिडला आहे. २०२० मध्ये एका एकरासाठी येणारा सरासरी खर्च १५ ते १८ हजार रुपये होता, तो २०२५ पर्यंत २५ ते २८ हजार रुपयांच्या वर गेला आहे.

Rice Farming Crisis
Thane District Bank: ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ९७ टक्के मतदान; उद्या होणार मतमोजणी

शासनाने भातासाठी जाहीर केलेला हमीभाव २,००० ते २,३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवला असला, तरी शासकीय खरेदी केंद्रे उशिरा सुरू होणे आणि तिथे असणारी बारदान्याची व वाहतुकीची अडचण यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आपला माल स्थानिक व्यापाऱ्यांना अत्यंत कमी दराने विकावा लागतो.

परतीच्या व अवकाळी पावासामुळे कापणीला आलेले भात शेतात भिजल्याने दाणे काळे पडतात. अशा दमट भाताची जेव्हा राईस मिलमध्ये भरडाई केली जाते, तेव्हा अखंड तांदूळ निघण्याऐवजी 'तुकडा तांदळाचे' प्रमाण ४० ते ५० टक्केपर्यंत वाढते. बाजारामध्ये अखंड तांदळाच्या तुलनेत तुकडा तांदळाला निम्म्याहून कमी भाव मिळतो.

परिणामी, चांगल्या दर्जाच्या भाताला मिळणारा २५०० रुपये क्विंटलचा भाव थेट १५०० ते १७०० रुपयांवर घसरतो. तसेच, पालघर, ठाणे भागात पिकणाऱ्या सुवासिक 'वाडा कोलम' किंवा 'पाचवी' सारख्या जातींचे योग्य ब्रँडिंग न झाल्याने कॉर्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांकडून कमी भावात भात खरेदी करून स्वतःच्या नावाने चढ्या दराने विकतात. याशिवाय, पशुखाद्य म्हणून विकला जाणारा भातपेंढा शेतातच कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे प्रति एकर ३ ते ५ हजार रुपयांचे हक्काचे उप-उत्पन्नही पूर्णपणे संपले आहे.

मुंबईच्या सानिध्यामुळे उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यात भातशेतीचे क्षेत्र सर्वात वेगाने सुमारे १७ टक्के घटले आहे. कल्याण, भिवंडी, शहापूर भागातील शेतजमिनी वेगाने गोदामांमध्ये आणि निवासी संकुलांमध्ये बदलत आहेत.

Rice Farming Crisis
Mango Crop Damage: आंबा नुकसानभरपाई निधीची गाडी निघाली कोकणात

तसेच मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण, जेएनपीए, दिघी बंदर आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीयोग्य क्षेत्राचे संपादन झाले आहे. भात लावणी आणि कापणीसाठी मजूर मिळणे अत्यंत कठीण झाले असून मजुरीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रति दिन व दोन वेळचे जेवण असे झाले आहेत. यामुळे त्रस्त होऊन तरुण वर्ग आता आंबा (हापूस), काजू बागायत किंवा पर्यटन व्यवसायाकडे वळत आहे.

थेट पेरणी करणारा ड्रम सिडर भातशेतीला नवा आधुनिक पर्याय शेतकरी विद्यापीठाच्या शिफारसींचा अवलंब न करता खतांचा व प्रामुख्याने युरियाचा अनियंत्रित वापर करतात, ज्यामुळे कीड वाढते. या मजुरांच्या टंचाईवर आणि वाढत्या खर्चावर मात करण्यासाठी 'डायरेक्ट सोइंग' म्हणजेच सुधारित ड्रम सिडरच्या साहाय्याने थेट पेरणी करणे हा भातशेतीला एक नवा आणि आधुनिक पर्याय आहे; यामुळे लावणीची गरज उरत नाही आणि मजुरांची मोठी बचत होते. यासोबतच, खाजण जमिनींसाठी समुद्राचे पाणी रोखणारे 'खारलँड' बंधारे तातडीने दुरुस्त करणे आणि खाऱ्या पाण्यात तग धरणाऱ्या'पनवेल-१' व 'पनवेल-३'सारख्या हवामान-अनुकूल जातींचा वापर वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

-डॉ. रवींद्र मर्दाने, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत-रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news