Mango Crop Damage: आंबा नुकसानभरपाई निधीची गाडी निघाली कोकणात

कोकणातील चार जिल्ह्यांसाठी २०९ कोटी निधी जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार तुटपुंजी मदत
Mango Crop Damage
Mango Crop DamagePudhari
Published on
Updated on

कमलाकर होवाळ

माणगाव: एप्रिल महिन्यात हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभागातील हापूस आंबा पिकाची पूर्णपणे नासाडी केली. कोकणातील शेतकऱ्यांसाठी हापूस आंबा हे केवळ एक फळपीक नसून त्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे.

कुटुंबाला, नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पुरेसा आंबा ठेवून उर्वरित आंबा व्यापाऱ्यांना विकून मिळणाऱ्या उत्पन्नावरच इथल्या बागायतदारांचे संपूर्ण वर्ष चालते. मात्र यंदा हेच पीक हातातून गेल्यामुळे शेकडो कुटुंबांवर थेट उपासमारीची वेळ ओढवली आहे.

Mango Crop Damage
Fishermen Crisis: सागरी मच्छिमारी बंद; पोटासाठी मोलमजुरीची वेळ

या गंभीर प्रश्नावर विधानसभेत वारंवार आवाज उठवला गेला, मात्र त्यावर संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून केवळ चर्चा आणि आश्वासनांचेच गाजर दाखवले गेले, ठोस कृती मात्र कुठेच दिसली नाही.

मंत्री भरतशेठ गोगावले हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्याकडे राज्याचे फलोत्पादन खाते असल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांना मोठी आशा होती. ते स्वतः कोकणातील असल्याने इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतील आणि नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देतील, अशी अपेक्षा शेतकरी बांधव बाळगून होते.

परंतु प्रत्यक्षात शासनाकडून जाहीर झालेली अपुरी भरपाई पाहून शेतकऱ्यांच्या आशेचा भंग झाला आणि सर्वत्र निराशेचे वातावरण पसरले. कोकणातील हापूस आंबा हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे फळपीक असल्यामुळे येथील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याची लागवड केली आहे.

Mango Crop Damage
Maldunge Ration Shop: मालडुंगेमधील रेशन धान्याची माहिती देण्यास पुरवठा विभागाची टाळाटाळ?

मात्र सततच्या हवामान बदलामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींनी हे संपूर्ण पीक उद्ध्वस्त करून टाकले आणि इथला शेतकरी पूर्णतः कोलमडून पडला आहे. शासनाकडून न्याय मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र अत्यंत तुटपुंजी भरपाई पडल्यामुळे त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

नुकसान मार्च-एप्रिल महिन्यात झाले, मात्र महिने उलटूनही भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडलेली नाही. यामुळे सरकारी काम आणि किती महिने थांब, असा संतप्त सवाल शेतकरी आता उघडपणे विचारत आहेत.

शासनाचा हा दुजाभाव कोकणातील बागायतदार उघड्या डोळ्यांनी पाहत असून, त्या विरोधात त्यांच्या मनात तीव्र संताप खदखदत आहे. केवळ माणगाव तालुक्याचाच विचार केला तरी या तालुक्यात सुमारे ९५० चे वर बागायतदार शेतकरी असून सरासरी ४८५ हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर हापूस आंब्याची लागवड केली जाते. शासनाने एका झाडामागे केवळ २५० रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. कृषी विभागाच्या निकषा नुसार एका हेक्टर मध्ये साधारण १०० झाडे धरली जातात, त्यानुसार प्रति हेक्टर केवळ २२ हजार ५०० रुपये भरपाई

शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे, जी लवकरच बागायतदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. २५ जून २०२६ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णया नुसार क्रमांक सीएलएस २०२६/प्र.क्र. ७६, भाग-१५, म-३ संपूर्ण कोकण विभागासाठी निधीचे वितरण निश्चित करण्यात आले आहे.

रायगडसाठी २० कोटींचा निधी

या शासन निर्णयातील आकडेवारीवर नजर टाकली असता वास्तव अधिकच स्पष्ट होते. ठाणे जिल्ह्यात ४ हजार ६६९ शेतकरी बाधित झाले असून २ हजार ९५ हेक्टर क्षेत्रासाठी ४ कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

पालघर जिल्ह्यात तब्बल १७ हजार ६१२ शेतकऱ्यांचे २ हजार ८६७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यासाठी ६ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात १७ हजार २० शेतकऱ्यांचे जवळपास ८ हजार ९८७ हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त झाले असून त्यासाठी २० कोटी २८ लाख रुपये निधी जाहीर झाला आहे.

सर्वाधिक फटका रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना बसला असून रत्नागिरीत ५२ हजार ६२८ शेतकऱ्यांचे ४३ हजार ६६४ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ९८ कोटी ४४ लाख रुपये, तर सिंधुदुर्गात ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांचे ३४ हजार ७२८ हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त होऊन ७९ कोटी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण कोकण विभागाचा विचार केला तर तब्बल १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांचे ९२ हजार ३४२ हेक्टर क्षेत्र नैसर्गिक आपत्तीत बाधित झाले असून त्यासाठी एकूण २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपये इतका निधी जाहीर झाला आहे.

राज्यातील विदर्भ विभागात कांदा, बटाटा, हळद, कापूस, सोयाबीन, संत्री, केळी यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. विदर्भात जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती कोसळली, तेव्हा शासनाने मोठ्या प्रमाणावर आणि न्यायाने नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या हाती दिली. मात्र कोकणातील शेतकऱ्यांच्या बाबतीत हीच भरपाई अत्यंत तुटपुंजी स्वरूपात आणि तीसुद्धा तीन-चार महिने उशिराने दिली जात आहे.

- दत्तूशेठ पवार, शेतकरी, निजामपू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news