

म्हसळा ः सेरेब्रल पाल्सी ( मेंदूचा पक्षाघात) नियंत्रण व अवयवांवर सतत परिणाम करण्या-या आजाराने ग्रस्त असलेल्या ऋषिकेश माळी ( वय 22) या युवकाने सर करून तेथे तिरंगा फडकवला व आपले कळसूबाई शिखर सर करण्याचे स्वप्न साकार केले आहे. मनात असलेली सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वाव मिळत नव्हता पण शिव ऊर्जा प्रतिष्ठान महाराष्ट्रने दिलेली प्रेरणा आणि पालकांनी दिलेली भक्कम साथ यामुळेच हे शक्य झाले.
बारी गावातील शक्ती देवता हनुमान मंदिरात आशिर्वाद घंटा वाजवून व सर्वत्र नकार घंटा ऐकून सूर्य प्रकाश देवतेसाठी न थांबता स्वयंप्रकाशित होऊन धुके व अंधुक प्रकाशात ऋषिकेशने महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई चा प्रवास सुरू केला. खाच खळगे, दगड गोटे, तीव्र उतार व चढाव, मोठ मोठाले खडक, तसेच 80 ते 90 अशं चढाव व उतार असलेले जेमतेम पाऊल टेकवण्याइतपत रूंदी असलेल्या लोखंडी शिड्या आणि चढताना छाती भरून टाकणारे व उतरताना पाय सटकला जीव संकटात आणणारे तीव्र मातीचे चढाव उतार या सर्वांचा सामना करत आपल्या क्षीण दीन पावलांना मजबूत बनवत ऋषिकेश अथक मेहनतीनंतर महाराष्ट्र राज्याचे माऊंट एव्हरेस्ट कळसूबाई शिखर सर केले.
ऋषिकेशने आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर व त्याची आई शीतल माळी हीने दिलेल्या परिस्थिती व मात करण्यासाठी जिद्द व अथक मेहनत या शिकवणी च्या जोरावर कळसूबाई शिखर सर दिव्यांग मुलांना देखील शक्य आहे फक्त आपल्या तील नकारात्मकता काढून टाकून अशा मुलांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याची गरज आहे हे उदाहरणासह दाखवून दिले. ऋषिकेशला या गिर्यारोहणासाठी शिव ऊर्जा दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गाडे ( संभाजी नगर), कचरू चांभारे ( बीड) 42 वेळा कळसूबाई शिखर सर केलेला अंध दिव्यांग खेळाडू सागर बोडके यांनी प्रेरणा दिली.
जन्मापासूनच आजाराने ग्रस्त
ऋषिकेश हा सेरेब्रल पाल्सी या असाध्य व आजन्म आजाराने ग्रस्त असून सुद्धा रसायन शास्त्र या विषयात पदवी धारक असून त्याने औषध शास्र पदविका अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे. नुकतेच ऋषिकेश ने संभाजी नगर येथील पॅराऑलिम्पिक जलतरण राज्य स्तरीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता.आणि आता आणखी एक सन्मान पात्र बाब म्हणजे ऋषिकेशने महाराष्ट्रातील 1646 मीटर उंच असलेले ट्रेकर्सच्या आवडत्या व अवघड शिखरावर तिरंगा फडकवला आहे. बहुधा तो असा पराक्रम करणारा सेरेब्रल पाल्सी या दिव्यांग प्रकारातील एकमेव ट्रेकर गिर्यारोहक असावा.
मुलांना फुलासारखे जपून नका
दिव्यांग मुलांतील काही उणीवा या त्यांच्या अवयवांमुळे राहणारच मात्र त्यांना फुलासारखे न जपता प्रत्येक क्षेत्रात आपण घेऊन जाऊ शकतो व देण्याचा प्रयत्न करू शकतो. ऋषिकेशला आम्ही पालकांनी सर्व काही देण्याचा प्रयत्न केला आहे. तसा सर्व पालकांनी देण्याचा जरूर प्रयत्न करावा असा संदेश शीतल सुदाम माळी यांनी पालकांना दिला आहे.