

नेरळ: कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या प्रस्तावित उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून वातावरण तापले असताना आता या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका समोर येणार आहे.
प्रकल्पग्रस्त आणि कर्जत संघर्ष समितीचे समन्वयक अॅड. कैलास मोरे यांनी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर २८ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे प्रकल्पस्थळी प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार असून, त्यानंतर कर्जतमध्ये सभा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या भेटीवेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव, जितेंद्र पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अभिजित घरत, शैलेश सुर्वे, कर्जत तालुका अध्यक्ष यशवंत भवारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सायडोंगर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून आणि पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्याकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे.
टोरंट पॉवरचा प्रस्तावित प्रकल्प सुमारे ३ हजार मेगावॅट क्षमतेचा असून प्रकल्पासाठी मोठ्या क्षेत्रातील जमीन आणि वनक्षेत्राचा वापर प्रस्तावित आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर सादर करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या पर्यावरणीय सारांशात २३३ हेक्टर वनजमिनीवर अंदाजे ४८ हजार झाडे व झुडपे तोडण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अलीकडील वृत्तांमध्ये मात्र ३२ हजारांहून अधिक झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचा संदर्भ आहे.
वृक्षतोडीमुळे सायडोंगर परिसरातील पर्यावरणीय समतोल, जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास तसेच नैसर्गिक जलप्रवाहांवर परिणाम होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः पेज नदीच्या उगमक्षेत्राशी संबंधित पर्यावरणीय प्रश्न, स्थानिक शेती आणि भविष्यातील पाणी उपलब्धतेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. मात्र प्रकल्पाच्या पर्यावरणीय कागदपत्रांमध्येही वृक्षतोडीमुळे जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान, वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय प्रतिक्रिया यापूर्वीच उमटू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर नेते आदित्य ठाकरे यांनीही सायडोंगर परिसरातील वृक्षतोडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाहणी दौरा व होणाऱ्या सभेमुळे या प्रश्नाला आणखी राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.
२८ ऑक्टोबरच्या पाहणीदरम्यान प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, वृक्षतोडीबाबत उपलब्ध परवानग्या व पर्यावरणीय अटींची अंमलबजावणी कशी होत आहे आणि स्थानिकांच्या आक्षेपांबाबत राज ठाकरे सभेतून कोणती भूमिका मांडतात, याकडे कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे. पाहणीनंतरच्या कर्जत येथील सभेत या प्रश्नावर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.