

Mumbai Goa Highway Accident
कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील पुई गावाच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर टाटा कारने सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाला. रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र विठ्ठल मांजरे (वय ४८, रा. गोवे, ता. रोहा, जि. रायगड) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिदास रामचंद्र जाधव हे मुंबई-गोवा महामार्गावरून दुचाकीने कोलाडच्या दिशेने मुंबईकडे जात होते. त्यांच्यापुढे रवींद्र मांजरे हे सायकलवरून रस्त्याच्या डाव्या बाजूने गोवे गावाकडे जात होते. यावेळी कोलाडकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा कारने (एमएच ०१, ईआर ८०१७) सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली.
कारचालक गिरीष मोहन जाधव (वय ५०, रा. काळाचौकी, मुंबई) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत रवींद्र मांजरे यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. बी. फार्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. जी. भोजकर पुढील तपास करीत आहेत.