

अलिबाग ः रायगड जिल्हा परिषदेमध्ये आठ महिन्यापूर्वी झालेल्या आर्थिक अपहार प्रकरणातील एक आरोपी कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य सेवन करून जीवन संपवले आहे. ज्योतिराम पांडुरंग वरुडे (वय 48, रा. तळाशेत, इंदापूर, ता. माणगाव) असे त्याचे नाव असून त्यांने अलिबाग जवळील विद्यानगर येथे आपल्या मेव्हण्यांच्या घरी सोमवारी हे टोकाचे पाऊल उचलले.
फेब्रुवारी 2025 मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणी ज्योतिराम वरुडे, नाना कोरडे आणि महेश मांडवकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक अपहार प्रकरणाच्या या चौकशी सत्रांमुळे वरुडे यांच्यावर मानसिक तणाव वाढत चालल्याची चर्चा सुरू होती. 20 ऑक्टोबर रोजी, त्यांनी विद्यानगर येथे आपल्या मेव्हण्याच्या घरी असताना विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली. नातेवाईकांनी तातडीने त्यास अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी 20ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30 वाजता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
या घटनेबाबत त्यांची पत्नी अश्विनी वरुडे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली असून, त्या अनूशंगाने अलिबाग पोलीसांचा तपास सुरू आहे. त्यांनी जीवन नेमके आर्थिक अपहारप्रकरणातील दबावामुळे संपवले की इतर कोणत्या तरी वैयक्तिक कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.