

अलिबाग ः सुवर्णा दिवेकर
सौर ऊर्जा प्रकल्प आणि विद्युत ठेकेदारीचे क्षेत्र एकेकाळी केवळ पुरुषांची मक्तेदारी मानले जात होते. परंतु अलिबागमधील महिलांनी हा समज बदलून नवा इतिहास रचला आहे. ‘फर्स्ट लेडीज सोलार इन्स्टॉलेशन टीम’ या कंत्राटदार महिला पथकाने नुकताच एक महत्त्वाकांक्षी सौर प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून वीज तांत्रिक क्षेत्रात महिलांची ताकद दाखवून दिली असून राज्याच्या वीज वितरण कंपनीतील ही पहिली महिला टिम ठरली आहे.
या टीमचे नेतृत्व वीज अभियंता प्राची विवेक देवळे यांनी केले असून त्यांनी राज्यातील पहिल्या महिला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सानिका पाटील, सेजल पाटील आणि रोशनी गुंजाळ या सदस्यांनी प्रकल्पातील सर्व तांत्रिक कामकाज कुशलतेने पार पाडले.ही टीम टाटा पॉवर टेक या कंपनीच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. संपूर्ण प्रकल्प महिलांच्या हातून पूर्ण झाल्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि तांत्रिक क्षेत्रातील त्यांच्या क्षमतेचा नवा मानदंड निर्माण झाला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वततेचा ध्यास
या पथकाने नामांकित ब्रँडच्या उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करून सौर ऊर्जा प्रणालीची स्थापना केली. कामात अचूकता, सुरक्षितता आणि व्यावसायिकतेचा उत्तम संगम दिसून आला. ही महिला टीम फक्त रोजगाराच्या दृष्टीने नव्हे, तर स्वच्छ ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देऊन शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने काम करत आहे.
परंपरेला छेद देत नवा आदर्श
विद्युत ठेकेदारी हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे हा पारंपरिक समज या महिला ठेकेदारांनी मोडीत काढला आहे. मेहनत, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर महिलाही अशा क्षेत्रात उत्तमरीत्या काम करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.अलिबागमधील या महिला ठेकेदार टीमच्या कामगिरीमुळे रायगड जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक महिलांना सौर ऊर्जा व तांत्रिक क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळत आहे. ही यशकथा हरित ऊर्जेच्या क्षेत्रात महिलांच्या वाढत्या सहभागाचे प्रतीक ठरत आहे.
अवघड आणि अत्यंत कष्टाच्या अशा विज वाहीनी जोडणी, ट्रान्स्फॉर्मर सेटअप, पोल उभारणी, सोलर अशा कामाच्या क्षेत्रात महिला विज अभियंता प्राची देवळे यांच्या फर्स्ट लेडीज सोलार टीमने विज वितरण कंपनीत कंत्राटदार म्हणून दाखल होवून, केलेले काम हे निश्चितच कौतूकास्पद असून त्यांच्याकडून प्रेरणा घेवून आता अन्य महिला वीज अभियंता या क्षेत्रात पूढे येतील असा विश्वास वाटतो.
धनराज बिक्कर, मुख्य अभियंता, विज वितरण कंपनी, पेण-रायगड