Raigad ZP elections : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा तिढा

भाजप 24, शिवसेना 24 आणि राष्ट्रवादीला फक्त 11 जागांचा प्रस्ताव; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा?
Raigad ZP elections
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा तिढाpudhari photo
Published on
Updated on

माणगाव : कमलाकर होवाळ

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीत जागा वाटपावरून तणाव वाढला आहे. भारतीय जनता पक्षाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार भाजपला 24, शिवसेना शिंदे गटाला 24 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 11 जागा देण्याचे सूत्र मांडले गेले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव ठामपणे नाकारत समान 20 जागा मिळाल्याशिवाय युती शक्य नाही अशी भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळे महायुतीचे गणित बिघडणार असून, आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.

तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते स्वबळावर निवडणुकीला सज्ज होत आहेत. मांडलेल्या प्रस्तावात प्रत्येक आमदाराला 8 जागांच्या प्रमाणात वाटप करण्याचे सूत्र मांडले गेले आहे. रायगड जिल्ह्यात भाजपकडे 3 आमदार असल्याने त्यांना 24 जागा, शिवसेनेकडे 3 आमदार असल्याने त्यांनाही 24 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 1 आमदार असल्याने 8 जागा आणि त्यांचा एक खासदार असल्याने आणखी 3 जागा - असे एकूण 11 जागांचे गणित मांडले आहे.

Raigad ZP elections
Raigad News : खरिपात जिल्ह्यातील 14 हजार 774 शेतकऱ्यांचे नुकसान

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने हा हिशोब थेट नाकारला. पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाने ठाम भूमिका घेतली की, खासदार आणि आमदार मिळून आमचं प्रतिनिधित्व कमी नाही. रायगडमध्ये आमचा प्रभाव दक्षिण विभागात प्रबळ आहे. त्यामुळे समान वाटा म्हणून किमान 20 जागा मिळाल्याशिवाय युती शक्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी यांनी स्पष्ट सांगितले की, मागील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने महत्त्वाच्या मतदारसंघांत दमदार कामगिरी केली आहे.

दक्षिण रायगडमध्ये तळे, माणगाव, महाड, पोलादपूर, खोपोली कर्जत अशा अनेक भागांत पक्षाची मजबूत संघटना आहे. याउलट भाजपचा प्रभाव उत्तर रायगडमध्ये पेण, अलिबाग, उरण, पनवेल या मतदारसंघांपुरता मर्यादित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 20-20-20 असे समान वाटपाचे सूत्र मांडले असले, तरी शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी त्यास अमान्य ठरवले आहे. शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे की, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्यांचे जनाधार वाढले असून त्यांचा ‌‘ग्राऊंड कनेक्ट‌’ राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे समान वाटप शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Raigad ZP elections
Local body elections Thane : जि.प, पं. समिती निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा

रायगड जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे 3, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आमदार, तसेच राष्ट्रवादीचा 1 खासदार आहे. मंत्रीपदाच्या बाबतीत शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री आहे. रायगड जिल्हा परिषदेत एकूण 59 जागा आहेत, त्यापैकी बहुतांश जागांवर स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांचा प्रभाव वेगवेगळ्या भागात दिसून येतो. उत्तर रायगडमध्ये भाजपचे संघटन मजबूत आहे, तर दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादीची पकड अधिक घट्ट आहे.

शिवसेना शिंदे गटाने मध्यवर्ती आणि किनारी भागात संघटन उभारण्यावर भर दिला आहे. महायुतीच्या चर्चेने अनिश्चिततेचा रंग घेतल्याने तिन्ही पक्षांनी आता स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने रणनीती आखण्यासाठी जिल्हास्तरीय बैठकांचा धडाका सुरू केला आहे. शिवसेनेने स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांशी थेट संपर्क वाढवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने तर स्वबळावर सत्ता आणू या घोषवाक्याचा प्रचार सुरू केला आहे.

राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी म्हणाले, दरवेळी आमच्याकडे मतदारसंघ मजबूत असतानाही जागा कमी देण्याचा प्रयत्न होतो. यावेळी आम्ही अन्याय होऊ देणार नाही. स्वबळावर लढलो तरी रायगडमध्ये चांगले यश मिळेल. राजकीय तज्ज्ञांच्या मते, निवडणुकीपूर्वी महायुती होण्याची शक्यता अत्यल्प आहे. मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळव होऊ शकते. रायगडमध्ये तिन्ही पक्षांमध्ये कार्यकर्तास्तरावर अजूनही संपर्क आणि वैयक्तिक नातेसंबंध टिकून आहेत. त्यामुळे निवडणुकीनंतर परस्पर सहकार्याच्या शक्यता कायम आहेत.

राजकीय विलेषक म्हणतात, रायगडमध्ये महायुतीचा पाया कमजोर आहे. जागावाटप आणि नेतृत्वाच्या वादामुळे एकीची शक्यता संपली आहे. तरीही निवडणुकीनंतर परिस्थिती बदलल्यास सत्तेचा समीकरणांचा नवा खेळ रंगू शकतो. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांत सुरू असलेले जागावाटपाचे राजकारण म्हणजे एक प्रकारची राजकीय शतरंजाची लढाई ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस समान वाट्याची मागणी करत ठाम उभी आहे, तर शिवसेना आणि भाजप त्यांच्या प्रभावाच्या जोरावर अधिक जागांवर दावा करत आहेत. पालकमंत्री पदावरील संघर्ष आणि परस्पर टीकेमुळे वातावरण अधिक तापले असून, महायुती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निवडणुकीपूर्वी काही तडजोडीचा तोडगा निघतो का, की तिन्ही पक्ष स्वबळावर लढाईला उतरतात, याकडे लागले आहे.

  • रायगड जिल्ह्यात सध्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तीव्र मतभेद आहेत. या वादामुळे दोन्ही पक्षांमधील विश्वास संपुष्टात आल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालकमंत्र्यांच्या निर्णयांवर आक्षेप घेतला जात आहे, तर शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीवर थेट वैयक्तिक टीका केली आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही पक्षांतील संबंध पूर्णतः बिघडले असून, युतीचे प्रयत्न जवळपास संपुष्टात आले आहेत. एका वरिष्ठ कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पालकमंत्री पदावरून दोन्ही पक्षांमध्ये एवढा अविश्वास निर्माण झाला आहे की, निवडणुकीपूर्वी एकत्र येणे जवळपास अशक्य आहे. मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी परिस्थिती वेगळी असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news