

भिवंडी : ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका संदर्भात महायुती बाबत कोणताही निर्णय होत नसताना शिवसेना पक्षाने एकला चलो रे च्या मार्गाने तयारी सुरू केली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीस सुरवात झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील महायुतीचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होणे अपेक्षित असताना, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून जिल्हा परिषदेच्या 21 जागां करीता मुलाखती घेण्याची सुरुवात जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या उपस्थितीत 21 जिल्हा परिषद गटातील उमेदवारांच्या मुलाखती कशेळी येथील शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख कार्यालयात गुरुवारी (23) रोजी सकाळी आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी शिवसेनेचे उपनेते रुपेश म्हात्रे, अरुण पाटील निलेश सांबरे लोकसभा संपर्कप्रमुख मदन नाईक महिला आघाडीच्या मोनिका पालवे, कशेळी सरपंच वैशालीताई थळे, तालुकाप्रमुख इंद्रपाल तरे, युवासेनेचे प्रभुदास नाईक हे मुलाखती घेण्यासाठी उपस्थितीत होते.
आगामी निवडणुका लढविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असुन शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी कामाला सुरुवात करावी. पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत, त्यासाठी सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकदिलाने काम करावे आणि ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना भगवा फडकवा असे आवाहन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी केले. तर शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे व जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागावे पक्ष शिस्तही महत्त्वाची आहे. ती टिकली तर आपण विजय होऊ, असा विश्वास यावेळी शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी व्यक्त केला.
या भागातील मुलाखतींसाठी गर्दी
जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी अंबाडी, गणेशपुरी, मोहंडूळ, राहनाळ, काल्हेर, पडघा बोरीवली, कोनगांव, अंजूर दिवे, खारबाव अशा विविध जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार तसेच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.