

Raigad Mhasla MSEB News
म्हसळा : पुढारी वृत्तसेवा
पावसाला सुरुवात झाली आणि म्हसळा तालुका शहरासह ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. म्हसळा तालुक्याचा उप विभागीय वीज कार्यालया पासून ग्रामीण भागातील हद्द विस्तार 25 ते 30 किमी अंतरावर आहे. वीज बंद पडला की ती परत केव्हा येईल याची खात्री नसल्याने वाड्यावस्तीवरील नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागते.
वेऴी अवेळी पाऊस पडत असला तरी हवामानात बदल झाल्याने उकाडयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायंकाळी मच्छर, कीटक, सर्प जातीचे सरपटणारे प्राणी यांचा प्रादुर्भाव असतो. महावितरण कंपनीने विजेच्या तक्रारीची लागलीच दखल घेऊन तातडीने दुरुस्तीची कामे करावीत अशी म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. तसेच महावितरण कार्यालयावर राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, पुढारी मंडळी किंवा सामाजिक पदाधिकारी यांचे कोणाचेही वचक राहिलेले नाही. महावितरण बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी असून त्या नाहक ग्राहकांना सहन कराव्या लागत आहेत.
एखादे वेळेस वीजग्राहकांचे विद्युत बिल भरायचे राहिले तर वायरमन वसुली साठी सारखा सारखा तगादा लावतात परंतु एखाद्या गावात विजेची समस्या निर्माण झाली असली तर त्याची तातडीने दखल घेण्यात वायरमन देखील कानाडोळा करतात अशी चर्चा सुरु असून महावितरण विभागाने सततचा गलथान कारभारात सुधारणा करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. म्हसळा तालुक्यातील जांभूळ फीडर हा श्रीवर्धन तालुक्याला जोडला आहे. त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात काही अडचण निर्माण झाली की जांभूळ फिडर वरील गावातील वीज गायब होते. वीजवाहिन्या अत्यंत जुन्या झाल्याने केव्हाही तुटतात. ट्रान्सफॉर्मर मध्ये दोष निर्माण होऊन केव्हाही वीज जाते. वीज गेल्यानंतर नागरिक तक्रार देतात परंतु त्याची महावितरणचे संबंधित अधिकारी कर्मचारी वेळीच दखल घेत नाहीत.
वीज गेल्यानंतर ती केव्हा येईल याची खात्री नसल्याने वाड्यावस्त्यावरील नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागते. महावितरणाचे अधिकार्यांना याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात देखील हजारो विज ग्राहकांना चांगली सुविधा पुरविण्यात महावितरण कंपनीचे म्हसळा कार्यालय अपयशी ठरत आहे.
पावसामुळे वरवटणे विभाग व तालुक्याच्या अन्य भागांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार होत आहे. यामुळे जांभूळ फीडर वरील अनेक गावे अंधारात पडतात. मे महिन्याच्या सुरुवातीच्या पावसाने जर अशी स्थिती केली असेल तर पुढील तीन महिन्यांच्या पावसाळ्यात महावितरण काय सुधारणा करणार... ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.