

जयवंत हाबळे
कर्जत : कर्जत तालुक्यातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाण असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी वसलेल्या बेकरे गावात श्रद्धा, परंपरा आणि इतिहास यांचा त्रिवेणी संगम दरवर्षी पौष पौर्णिमेला अनुभवायला मिळतो. या गावाचे ग्रामदैवत असलेले जागृत खांबाया बाप्पाचे स्वयंभू देवस्थान भाविकांच्या अपार श्रद्धेचे केंद्र असून, “चितले ते पूर्ण होते” हा विश्वास आजही तितक्याच ठामपणे जपला जात आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले बेकरे गाव तसं पाहायला टिपिकल खेडं; मात्र हिरवीगार वनराई, पावसाळ्यात दऱ्याखोऱ्यांतून कोसळणारे धबधबे, जवळच असलेला विकटगड (पेठ किल्ला) आणि स्वराज्याच्या इतिहासाशी जोडलेली भंडारवाट, या साऱ्यामुळे गावाचे महत्त्व अनन्यसाधारण ठरते. शिवकालीन इतिहासात कल्याणचा खजिना लुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भंडारवाटेने प्रवास करत खांबाया देवाचे दर्शन घेतल्याचा उल्लेख ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. ज्येष्ठ नागरिकांच्या कथनानुसार, खांबाया देव रात्री घोड्यावर आरूढ होऊन, हातात घुंगराची काठी घेत गावाभोवती फेरफटका मारत गावाचे रक्षण करतो. त्यामुळेच या देवस्थानाला जागृत दैवत म्हणून ओळखले जाते.
सन 1992 साली जिर्णोद्धार करण्यात आलेल्या खांबाया मंदिराचा वर्धापन दिन दरवर्षी पौष पौर्णिमेला मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. या दिवशी मंदिर परिसरात पहाटेपासूनच अभिषेक, महापूजा, धार्मिक विधी सुरू होतात. परिसरातीलच नव्हे तर दूरवरून आलेले हजारो भाविक दर्शनासाठी रांगा लावतात..मंदिर परिसरातील सकाळचा मोरांचा वावर, डोंगररांगांनी वेढलेले नयनरम्य वातावरण आणि भक्तीचा दरवळ, हे दृश्य पाहणाऱ्याच्या मनात दीर्घकाळ घर करून राहते. यावर्षीही दि. 3 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेनिमित्त खांबाया मंदिरात अभिषेक, महापूजा व दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सर्व भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जय खांबाया तरुण मंडळ व बेकरे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रद्धा, इतिहास आणि परंपरेचा हा भक्तिमय जागर अनुभवण्यासाठी बेकरे गाव सज्ज झाले असून, जागृत खांबाया देवाच्या पालखीचा सोहळा भाविकांच्या आस्थेचे प्रतीक ठरत आहे. खांबाया देवाची पालखी जेव्हा खांबलिंगेश्वराच्या भेटीला निघते, तेव्हा संपूर्ण बेकरे गाव भक्तिमय वातावरणात न्हालेला दिसतो. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदंगांचा निनाद, “जय खांबाया”च्या जयघोषात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण त्या जोशात, त्या उमेदीने, त्या ताकदीने सहभागी होतात.