

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दररोज तसेच शनिवार-रविवार, सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. या वाढत्या गर्दीमुळे मंदिर परिसरातील सुरक्षा, वाहतूक नियमन, अतिक्रमण, भाविकांची फसवणूक आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे ही मोठी आव्हाने देवस्थान व प्रशासनासमोर उभी राहिली आहेत. जिल्हाप्रशासन व पोलिसयंत्रणेच्यावतीने केलेल्या पाहणीअंतर्गत दिलेल्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांजवळ विनापरवाना दुकाने, तात्पुरती बांधकामे आणि अतिक्रमण वाढत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर ताण येत आहे. अनधिकृत दुकानदारांकडून भाविकांची दिशाभूल होण्याचे प्रकारही समोर येत आहेत. त्यामुळे दुकानदारांची अधिकृत यादी, क्रमांक आणि निश्चित जागांचे स्पष्ट चिन्हांकन नसणे हेही सुरक्षेच्या द़ृष्टीने एक गंभीर आव्हान ठरत आहे.
मंदिरात प्रवेश करताना डोअर फ—ेम मेटल डिटेक्टर्स आणि बॅग स्कॅनरचा प्रभावी व काटेकोर वापर न झाल्यास संशयास्पद अथवा प्रतिबंधित वस्तू मंदिरात नेल्या जाण्याचा धोका निर्माण होतो. ज्वलनशील वस्तू, धारदार हत्यारे किंवा धोकादायक साहित्य मंदिर परिसरात पोहोचू नये, यासाठी स्पष्ट सूचना फलक, तपासणीची शिस्तबद्ध पद्धत आणि नोंदवही ठेवणे आवश्यक ठरत आहे. या बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहिल्यास भाविकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो. दक्षिण प्रवेशद्वार परिसरातील वाहनतळ आणि अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनतळांचे योग्य नियोजन व भाविकांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग व्यवस्था हवी. मंदिर परिसरात दिशादर्शक फलकांचा अभाव, अनावश्यक गर्दी, विनाकारण छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरण यामुळे सुरक्षेच्या द़ृष्टीने संवेदनशील वातावरण निर्माण होत आहे.