

कैरो : इजिप्तची राजधानी कैरो येथे पुरातत्त्व विभागाने एक अत्यंत विस्मयकारक आणि ऐतिहासिक शोध लावला आहे. संशोधकांना सुमारे 4500 वर्षे जुने एक सूर्य मंदिर सापडले असून, हे मंदिर प्राचीन इजिप्तच्या पाचव्या साम्राज्यातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
इजिप्तच्या पुरावशेष आणि पर्यटन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा शोध इटली आणि पोलंडच्या संयुक्त पुरातत्त्व पथकाने लावला आहे. हे पथक ‘किंग न्युसेरे’ यांच्या मंदिराचा अभ्यास करत होते. या अभ्यासादरम्यान संशोधकांना सध्याच्या मंदिराच्या खाली कच्च्या विटांपासून बनवलेली एक प्राचीन इमारत सापडली. ही इमारत प्रत्यक्षात एक ‘सूर्य मंदिर’ असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, पाचव्या साम्राज्यातील (इसवी सन पूर्व 2465 ते 2323) सहाव्या राजाने स्वतःचे मंदिर बांधण्यासाठी या जुन्या सूर्य मंदिराचा काही भाग पाडून त्यावर बांधकाम केले होते.
या ऐतिहासिक उत्खननात अनेक महत्त्वपूर्ण वस्तू हाती लागल्या आहेत. मातीची भांडी आणि बिअर ग्लास : प्राचीन काळातील जीवनशैली आणि पूजेच्या पद्धती समजून घेण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. राजघराण्यातील शिक्के : पाचव्या साम्राज्यातील राजांची नावे असलेले काही शिक्के अवशेषामध्ये सापडले आहेत. विटांचे बांधकाम : प्राचीन इजिप्शियन वास्तुकलेचा नमुना असलेल्या कच्च्या विटांच्या भिंती आणि स्तंभांचे अवशेष.
इतिहासासाठी हा शोध महत्त्वाचा का?
प्राचीन इजिप्तमध्ये एकूण सहा ते सात सूर्य मंदिरे असल्याचे मानले जाते. मात्र, आतापर्यंत त्यापैकी केवळ दोनच मंदिरे शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले होते. हे नवीन सापडलेले मंदिर त्यापैकीच एक असू शकते. हा शोध केवळ एका इमारतीचा नसून, तो प्राचीन इजिप्तची पूजा पद्धती, साम्राज्य रचना आणि हरवलेल्या मंदिरांच्या रहस्यावर प्रकाश टाकणारा आहे. यामुळे जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असलेल्या इजिप्शियन संस्कृतीचा इतिहास नव्याने समजून घेण्यास मदत होणार आहे.