

रेवदंडा : थेरोंडा आगळेचीवाडीतील सहा तरूणांच्या मदतीमुळे दोन मोठ्या ऑलिव्ह रिडले कासवांना रविवारी (दि.१९) जीवदान मिळाले. ही कासवे समुद्रकिनारी खाडीलगत टाकलेल्या मासेमारीच्या जाळ्यांमध्ये अडकली होती. त्यांची यातून सुटका करत त्यांना समुद्रात सोडून दिले. या युवकांच्या कामगिरीमुळे त्यांचे स्थानिक नागरिकांसह निसर्गप्रेमींकडून कौतूक होत आहे.
थेरोंडा आगळेचीवाडी बधाऱ्याजवळ स्थानिक सहा युवक समुद्रकिनारी फेरफटका मारायला आले होते. यावेळी दोन मोठे ऑलिव्ह रिडले कासव समुद्रकिनारी टाकलेल्या मासेमारीच्या जाळ्यात अडकून तडफडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सचिन बळी, सुशांत बळी, कुलदीप बळी, संजय जावसेन, महेश हाडके आणि सुधाकर हाडके या सहा जणांनी कासवांची जाळ्यातून सुटका केली. त्यांनतर त्या कासवांना समुद्रात सोडून दिले. या युवकांच्या कृतीमुळे मानवतेचे दर्शन झाले आहे. समुद्री जीवांचे आणि जैवविविधतेचे रक्षण करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा महत्त्वाचा संदेश या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.