Kolhapur Snake Rescuer: सर्पमित्र गोरख कुंभार : चार हजार सापांना जीवदान देणारा 'अवलिया'

Kolhapur Snake Rescuer
Kolhapur Snake RescuerPudhari Photo
Published on
Updated on

सुभाष पाटील

विशाळगड: साप म्हटलं की, अनेकांच्या मनात धडकी भरते, पण याच सापांना जीवदान देण्याचं पवित्र कार्य शाहुवाडी तालुक्यातील गोरख कुंभार गेली २० वर्षांपासून करत आहेत. आतापर्यंत तब्बल ४ हजार विषारी आणि बिनविषारी सापांना वाचवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं अतुलनीय काम त्यांनी केलं आहे. गोरख कुंभार यांना लोकं ‘सर्पमित्र’ या नावाने ओळखतात. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी प्रिया कुंभारही त्यांना या कार्यात मोलाची साथ देतात.

गोरख कुंभार यांनी गेल्या दोन दशकांपासून आपले जीवन सर्पसंरक्षणासाठी समर्पित केले आहे. साप दिसल्यास अनेकदा भीतीपोटी त्यांना मारले जाते, मात्र कुंभार यांनी लोकांना सापांबद्दल जनजागृती करून त्यांचे महत्त्व पटवून दिले आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर ते कोणताही धोका न पत्करता सापांना सुरक्षितपणे पकडतात आणि त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देतात.

नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापडा यांसारख्या विषारी सापांसह धूळनागीण, मांजऱ्या, हरणटोळ, धामण, दिवड, तस्कर, कवड्या यांसारख्या बिनविषारी सापांनाही त्यांनी जीवनदान दिलं आहे. साप डूख धरतो किंवा त्याला सुगंध आवडतो असे गैरसमज अजूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. यावर प्रबोधन करून लोकशिक्षणाच्या माध्यमातून सापांची हत्या थांबवणे गरजेचे आहे, असे कुंभार सांगतात. त्यांच्या या कार्यामुळे केवळ सापांचे जीवच वाचले नाहीत, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मोठी मदत झाली आहे. गोरख कुंभार यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे ते खऱ्या अर्थाने समाजासाठी एक आदर्श बनले आहेत.

सर्पमित्रांची वाढती गरज :

गोरख कुंभार यांच्यासारख्या सर्पमित्रांमुळे केवळ सापांचे प्राणच वाचत नाहीत, तर मानव आणि साप यांच्यातील संघर्ष कमी होण्यासही मदत होते. तालुक्यात राजाराम पाटील, नितीन कोठावळे, निरंजन मगर आदीही सापांना जीवदान देत आहेत. सापांविषयीची भीती कमी करून त्यांच्याबद्दल योग्य माहिती समाजापर्यंत पोहोचवणं हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे.

"माझ्यासाठी प्रत्येक साप महत्त्वाचा आहे, तो विषारी असो वा बिनविषारी. त्यांचे प्राण वाचवणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सापांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे आणि हे कार्य मी शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन."

- गोरख कुंभार, सर्पमित्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news