

Raigad Roha student stranded in Dubai
रोहे : रोहा तालुक्यातील धनगरआळी येथील हर्ष जितेंद्र दिवेकर (वय २३) हा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुबई येथे गेला असून सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तो तेथेच अडकला आहे. हर्ष हा “मास्टर इन रिअल इस्टेट” या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी २१ जानेवारी रोजी दुबईला गेला होता. मात्र सध्या इराण-इस्त्राईल-अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्याला भारतात परत येणे कठीण झाले आहे. हर्षसोबत आणखी किमान दहा भारतीय विद्यार्थीही दुबईमध्ये असल्याची माहिती त्याचे वडील जितेंद्र दिवेकर यांनी दिली.
हर्ष राहत असलेल्या परिसरात सध्या दैनंदिन व्यवहार सुरू असले तरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर भीतीचे वातावरण आहे. डोक्यावरून लढाऊ विमाने उडताना दिसत असल्याचे हर्षने वडिलांना सांगितले आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, अशा मार्गदर्शक सूचना दुबई प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
हर्षचा आपल्या कुटुंबाशी नियमित संपर्क सुरू असून त्याचे वडील जितेंद्र दिवेकर हे सातत्याने त्याच्याकडून परिस्थितीची माहिती घेत आहेत. जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडूनही कुटुंबीयांना तेथील परिस्थितीबाबत वेळोवेळी माहिती दिली जात आहे.
दरम्यान, विमानांची तिकीटे उपलब्ध नसल्यामुळे हर्षला सध्या भारतात परत येण्यासाठी अडचणी येत आहेत. राज्य शासन व केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याला सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. हर्ष लवकरात लवकर भारतात परत यावा, अशी अपेक्षा त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
सरकारकडून जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून माझ्याशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे. हर्षबाबतची माहिती वेळोवेळी दिली जाते. माझा मुलगा शिक्षणासाठी दुबईला गेला असून त्याला सुरक्षितपणे व लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, ही आमची विनंती आहे.
जितेंद्र रामभाऊ दिवेकर (वडील)