Raigad news | खारघर पोलिसांच्या 'निर्भया'चे स्टेअरिंग मद्यधुंद तरुणाच्या हाती...

दादागिरी करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना, नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
Raigad news
Raigad news
Published on
Updated on

विक्रम बाबर

पनवेल : महिलांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या नवी मुंबई पोलीस दलाच्या ‘निर्भया पथका’ची प्रतिमा एका खळबळजनक घटनेमुळे डागाळली आहे. सोमवारी रात्री खारघरमधील बैलपाडा परिसरात पोलिसांची अधिकृत ‘निर्भया गाडी’ एका मद्यधुंद खासगी कर्मचाऱ्याच्या ताब्यात असल्याचे उघड झाले. या तरुणाने रस्त्यावरील नागरिकांशी हुज्जत घालून धक्काबुक्की केल्याने परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका प्रकार काय घडला?

सोमवारी रात्री उशिरा बैलपाडा चौकात निर्भया पथकाची सरकारी गाडी उभी होती. गस्तीवर असलेली गाडी समजून सुरुवातीला नागरिकांनी दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळाने त्या गाडीतून एक तरुण बाहेर आला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. त्याने स्वतःला पोलीस विभागाशी संबंधित असल्याचे भासवून रस्त्यावरील तरुणांशी विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.

वातावरण तणावपूर्ण होताच नागरिकांनी धाडस दाखवून त्या तरुणाला पकडले. तो गाडी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच स्थानिकांनी त्याला रोखले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठत आहे.

खासगी कर्मचाऱ्यांचा वाढता वावर?

या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील गोपनीयतेचा आणि शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सरकारी वाहनापर्यंत आणि विशेषतः महिला सुरक्षा पथकाच्या गाडीपर्यंत एका बाहेरील व्यक्तीचा प्रवेश कसा झाला? यावरून आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. खारघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला ६ ते ७ खासगी कर्मचारी असल्याची चर्चा या निमित्ताने पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. चहा आणण्यापासून ते पोलीस ठाण्यातील कागदपत्रांच्या हाताळणीपर्यंत ही मंडळी सक्रिय असतात, असा दावा केला जात आहे.

"या घटनेची माहिती मिळताच आम्ही वाहन चालक राम नंदू पवार याच्यावर BNS कलम ३१४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याने ही गाडी नेमकी कधी आणि कोणत्या उद्देशाने नेली, याचा सखोल तपास सुरू आहे."

— संजय जोशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खारघर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news