

अलिबाग : रायगड जिल्ह्यात भाताची पिके बहरली असून सध्या कापणीला सुरूवात झाली आहे. तयार झालेले भाताचे पीक वाया जाण्यापूर्वी वाचवण्याची धडपड रायगडमधील शेतकरी करताना दिसत आहेत. नवरात्र संपताच शेतकरयांनी कापणीला सुरूवात केली असून चार दिवसांपासून अलिबागसह जिल्ह्यातील विविध भागांत कापणी सुरू झाली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यंदा वार्षिक पर्जन्यमानाच्या सरासरी 83. 7 टक्के पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या 16 टक्के पाऊस कमी झाला आहे. असे असले तरी देखील योग्यवेळी योग्य प्रमाणात झालेला पाऊस भातशेतीसाठी पूरक ठरला. त्यामुळे यंदा भाताचे पीक चांगले आले. गणेशोत्सवाच्या काळात पोटरया बाहेर येवून लोंब्यांमध्ये दाणा भरण्यास सुरूवात झाली. नवरात्रापूर्वी आणि नवरात्रीच्या काळात झालेल्या पावसाने जिल्हयाच्या अनेक भागात उभी पिके आडवी झाली. दाणा भरलेली कणसे शेतात साचलेल्या पाण्यात भिजून नुकसान झाले. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार हे नुकसान अंदाजे 2 हजार हेक्टर पेक्षा अधिकच्या क्षेत्रावर झाले आहे.
परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले असले तरीदेखील उर्वरित क्षेत्रातील पिके सध्या उत्तम स्थितीत असून शेतकरी कापणीच्या तयारीला लागले आहेत. तरी आता पावसाने काढता पाय घेतला आहे.
जिल्ह्यात यंदा 85 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. कोलम, सुवर्णा, रत्ना या जातींना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. शेतकरी कापणीच्या कामात व्यस्त आहेत. दुपारी उन्हाचा तडाखा वाढत असल्याने सकाळच्या वेळेत लवकर कापणीची कामे केली जात आहेत. पावसाचा जोर ओसरला असला तरी परतीच्या पावसाचा धोका अजूनही कायम आहे. संध्याकाळच्या सुमारास ढग दाटून येतात आणि शेतकरयांची धाकधूक वाढते.
ग्रामीण भागात मजुरांना मागणी
कापणी हंगाम सुरू झाल्याने ग्रामीण भागात मजुरांना रोजगाराची संधी मिळाली आहे. दिवसाला 300 ते 400 रुपये मजुरी मिळत असून, हे काम 20 ते 25 दिवस चालणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, हवामान अनुकूल राहिल्यास आणि पावसाने दगाफटका केला नाही तर यंदा भात उत्पादन समाधानकारक होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.