

वसई : वसई तालुक्यातील महानगरपालिकेच्या ताब्यातील एकूण 1464 हेक्टर आर कांदळवन क्षेत्रापैकी 502.63.63 हेक्टर आर क्षेत्र पालघर कांदळवन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वसई महसूल विभागाच्या माध्यमातून ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या क्षेत्राची मोजणी करून मिळावी, अशी मागणी आता वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र सीमांकनाअभावी कांदळवन मोजणी अशक्य असल्याची हतबलता भूमिअभिलेख उपअधीक्षकांनी दर्शवली आहे. त्यासाठी कांदळवन क्षेत्र सर्व्हे नंबरनिहाय चुना टाकून दाखविण्याबाबत आदेशित करावे, अशा उलट मागणीचे पत्र त्यांनी पालघर कांदळवन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान यांना धाडले आहे. या दोन विभागांंसह महापालिका व तहसील कार्यालयाच्या पत्रप्रपंचात नायगाव येथील विस्तृत कांदळवन क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले असून ते हटविण्याबाबत सर्वच विभागांनी हात वर केले आहेत.
तालुका वसई येथील 811.8518 हेक्टर आर क्षेत्र भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम-4 अन्वये ‘राखीव वन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानुसार; वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील एकूण 1464 हेक्टर आर कांदळवन क्षेत्रापैकी 502.63.63 हेक्टर आर क्षेत्रावरील कांदळवन व कांदळवन लागवडीयोग्य जागा कांदळवन विभागाने ताबा पावतीने कब्जात घेतली आहे.
दरम्यान; मौजे जूचंद्र येथील सर्व्हे क्रमांक 209/अ/1 येथील कांदळवनांची मोठ्या प्रमाणात तोड करून सदर जागा मोकळी करण्यात आलेली आहे. या जागेवर अतिक्रमण करण्यात येऊन अनधिकृत पार्किंग तळ व मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपऱ्या उभारून अतिक्रमण धारकांनी त्या भाड्याने दिलेल्या आहेत. परिणामी वनसंरक्षण , वन्यजीव संरक्षण कायदा व पर्यावरण संरक्षण चा भंग झालेला आहे. त्यामुळे संबंधित सर्व प्राधिकरणांनी अतिक्रमणधारकांवर नियोमोचित कायद्याअंतर्गत कारवाई करावी; तसेच सदर जागेवरील अतिक्रमण दूर करून या जागेवर कांदळवनांची पुनर्लागवड करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते एलयास जोसेफ डिसिल्वा यांनी लावून धरलेली आहे.
सदर मागणी अनुषंगाने एलयास जोसेफ डिसिल्वा यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर महापालिका, महसूल, भूमिअभिलेख व वनविभागाने एकमेकांसोबतचा पत्रव्यवहार जाहीर केला आहे. सदर पत्रव्यवहारातून सीमांकनाअभावी कांदळवन मोजणी अशक्य असल्याचा धक्कादायक खुलासा झालेला आहे.
सदर क्षेत्रात हद्दीच्या खुना निश्चित करण्याकरता सदर क्षेत्राची मोजणी करणे आवश्यक असल्याने मोजणी करून मिळावी, अशी मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतीक मोडवान यांची आहे. या मागणीअनुषंगाने वसई भूमिअभिलेख कार्यालयाने कुणाल मर्दे, गणेश कोकाटे, भूकरमापक व वैभव दळवे, भूकरमापक यांची नियुक्ती केलेली होती. त्याबरहुकूम 10 ऑक्टोबर 2025 पासून मोजणीकामी प्रत्यक्ष जागेवर हा कर्मचारी वर्ग येणार होता. त्यामुळे वनपरिक्षेत्र कार्यालयाने त्यांचे प्रतिनिधी जागेवर उपस्थितीत ठेवावेत, अशा सूचना वसई भूमिअभिलेख विभागाने केलेल्या होत्या. शिवाय; ताबा पावतीने ताब्यात घेतलेले कांदळवन क्षेत्र सव्हें नंबरनिहाय सीमांकन चुना टाकूण दाखविण्याबाबत आदेशित करावे, असेही म्हटले होते.