

Raigad Rain Update
रायगड : रायगड जिल्ह्याला आज गुरुवारी (दि. १९ जून) मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनली आहे. अंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तर पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अंबा नदीची धोका पातळी ९ मीटर आहे. पण सध्या नदीची पाणी पातळी १०.६० मीटर असून ती धोका पातळीपेक्षा जास्त आहे. कुंडलिका नदीची धोका पातळी २३.९५ मीटर असून सध्याची तिची पातळी २४.५० मीटर आहे.
पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर असून तिची पातळी संध्या २१.०५ मीटर आहे. सावित्री, उल्हास आणि गाढी नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे.
पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे रस्त्यावर पाणी आल्यामुळे पाली-वाकण रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे..
खालापूर, माथेरान, पनवेलमध्ये २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. अलिबागमध्ये १९० मिलिमीटर पाऊस पडला आहे.
कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे आज (दि. १९ जून) जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर आज रात्री ११:३० वाजेपर्यंत ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. या दरम्यान लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा तसेच किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा थांबविण्याचा इशारा देण्यात आला आहे.