

Raigad Rain Update news
अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना बुधवारी (दि.१९) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, श्री. किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यानुसार, अलिबाग, रोहा, तळा, महाड आणि पोलादपूर या पाच तालुक्यांतील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये उद्या बंद राहणार आहेत.
जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी पाणी पातळी धोकादायक झाली आहे. तसेच, दरडी कोसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
प्रशासनाने पालक आणि विद्यार्थ्यांना अधिकृत सूत्रांकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय कळवण्यात येतील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाली पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रोडवरून पाणी जात असल्यामुळे पाली-वाकण रोड वाहतुकीस बंद केला आहे. तसेच देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाट येथे 17 जून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. मद्यपान, धबधब्यावर पोहणे, धोकादायक सेल्फी/व्हिडीओ काढणे, प्लॅस्टिक/कचरा फेकणे, वाहन प्रवेश (अत्यावश्यक सेवा वगळून) असे 1 कि.मी. परिसरात नियम लागू करण्यात आले आहे.