

कळंबोली ः मौजे पुनाडे उरण येथील सरकारी जमीन बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्था अहमदाबाद या संस्थेला देण्याचे विचाराधीन असून याला पुनाडे ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. ही जागा धरण प्रकल्पग्रस्त असून त्या प्रकल्पग्रस्तांना परत देण्यात यावी अशी मागणी 2023 मध्ये करण्यात आली आहे. ती डावलून गुजरात मधील अहमदाबाद येथील संस्थेला देण्यात आली तर पुनाळे पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्तांचा मोठा जन आक्रोश उफाळून येईल असा इशारा चंद्रकांत कमल पाटील या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसहित शेकडो शेतकऱ्यांनी लेखी पत्राने शासनाला दिला आहे.
उरण तालुक्यातील पुनाडे, वशेणी आणि पनवेल तालुक्यातील केळवणे गावातील हजारो हेक्टर जमीनीत मोठा प्रमाणात भात शेतीचे उत्पादन घेतले जाते. या जमिनीतून दुबार पीक घेता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने लघु पाटबंधारे यांच्या माध्यमातून 1990 मध्येे वरील तिन्ही गावातील जमिनी संपादित करून शेती लागवडीसाठी धरण बांधण्यात आले आहे. या धरणामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी गेल्याने अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन गेले आहे. त्यांच्यावर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.त्या शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी शेती व फळफळावडा लागवडीसाठी गावात असलेल्या शासकीय जमिनी देण्यात याव्यात अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
शासन निर्णय रद्द करा
याबाबतील शासन निर्णय व आदेश रद्द करण्याची मागणी शेतकरी व नागरिक करीत आहेत. सदर प्रकरणी पुनर्विचार करण्यात यावा, शेतकरी, प्रकल्पग्रस्त यांचे पुनर्वसन करून सदर जमीन त्यांना देण्याची मागणी होतं आहे या प्रकरणी जिल्हा व कोकण विभाग पातळीवर लोकजण सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी यांच्याकडून केली जात आहे.