Raigad News : किल्ले रायगडावर रोपवे कंपनीची बेकायदेशीर कामेे सुरूच

बेकायदेशीर बांधकामाविरोधात केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नोटीसीला केराची टोपली
Raigad News
किल्ले रायगड
Published on
Updated on

इलियास ढोकले

नाते ः दुर्गराज रायगडावर रोपवे कंपनीच्या वतीने सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात केंद्रीय पुरातत्व विभागाने नोटीस देऊनही कामे पूर्णत्वास जात असल्याबद्दल रायगड प्राधिकाऱ्यांचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून व्यक्त केली आहे. रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोरोना महामारीचा कार्यकाळ वगळता प्रतिमा संभाजी राजे छत्रपती किल्ले रायगडावर प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी दुर्गराज रायगडावर आले होते. यादरम्यान रोपवे कंपनीकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कामे पाहून आश्चर्य व्यक्त केले.

Raigad News
Raigad bus accident: किल्ले रायगडकडे जाणारी सहलीची मिनीबस पलटी! 6 जण जखमी

रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आज भग्नावस्थेत आहे. त्याचे संवर्धन करायचे म्हटले तरी पुरातत्व विभागाच्या अगणित नियम आणि अटींचे अडथळे आहेत. अगणित बैठका, वारंवार पाठपुरावा आणि लेखी परवानग्या घेतल्याशिवाय पुरातत्त्व विभाग रायगड विकास प्राधिकरणाला गडावरील एक दगडही हलवू देत नाही. पण रोपवे कंपनीस मात्र रायगडावर विनापरवानगी हॉटेल, रेस्टोरेंट, कॅफे आणि सिमेंट काँक्रीटचे असे भव्य राजवाडे बांधण्यास खुली मुभा दिली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

रोपवे कंपनीने कसलीही परवानगी नसताना गडावर अतिक्रमण करून हॉटेल, कॅफे, रेस्टोरेंट अशी हजारो स्क्वेअर फुटांची मोठमोठी बांधकामे केली आहेत. विशेष म्हणजे पुरातत्व विभागाने काम थांबवण्याच्या नाममात्र नोटिसा दिल्यानंतर देखील त्या डावलून ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. एका व्यावसायिक कंपनीकडे इतके धाडस व आडमुठेपणा येतो कुठून? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जिथे या भारतभूमीने स्वातंत्र्याचा पहिला सूर्य पाहिला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवर व नगारखान्यावर छत बसविण्याकरिता मी गेले पाच-सात वर्षे दिल्लीत पाठपुरावा करीत आहे, मात्र वास्तुरचनात्मक पुरावे असूनदेखील आजही त्यासाठी परवानगी नाकारली जाते. या ऐतिहासिक वास्तूंना छत नाही, मात्र गडावर विनापरवानगी उभारलेल्या या अनधिकृत हॉटेल्सची विद्रूप छतं जाणिवपूर्वक दुर्लक्षित केली जातात याबाबत संभाजीराजे यांनी तीव्र खंत व्यक्त केली.

व्यावसायिक कंपनीला पाठबळ कुणाचे?

महाराजांच्या गडावर सरकारी नियम, नोटीसा धुडकावून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या आडमुठ्या व्यावसायिक कंपनीला कुणाचे पाठबळ आहे? रायगडच्या संवर्धनापेक्षा या कंपनीच्या आर्थिक फायद्यास अधिक महत्त्व देण्याची काय गरज आहे. अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. नुकताच दुर्गराज रायगड युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाला आहे. गडावर अशी बेकायदेशीर बांधकामे होत राहिली तर हे नामांकन देखील धोक्यात येऊ शकते. याला जबाबदार कोण असणार? केवळ ही कंपनी, वेळीच कठोर कारवाई न करणारा पुरातत्व विभाग, राज्य व केंद्र सरकार की या कंपनीला पाठीशी घालणारे लोक?अशी विचारणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र गडावर असा उन्मत्त व्यावसायिक अतिक्रमणवाद सहन केला जाणार नाही. रायगडाच्या अस्मितेपेक्षा मोठे काहीही असू शकत नाही,असा इशाराही त्यांनी आपल्या सोशल मीडियावरुन दिलेला आहे.

Raigad News
Raigad Fort: किल्ले रायगडकडे जाणाऱ्या घाट रस्त्याची पर्यटकांना भुरळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news