

रायगड ः त्यांनी सुपारी देवून फोडलेले कॅशबॉम्ब फुसके निघालेत. मी आता बॉम्ब असा फोडणार आहे की, ते रोहा सोडून, महाराष्ट्र सोडून विदेशात पळून जातील, असा दावा करत खा.सुनील तटकरे यांच्यावर जहरी टीका अलिबागचे शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांशी बोलताना केली होती. त्यावर ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना पलटवार करत, आमदार महेंद्र दळवी यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्ये करित असतील असे मला वाटते असे म्हटले आहे. परिणामी पून्हा एकदा तटकरे- दळवी वाद उफाळला असल्याचे दिसून येत आहे.
आमदार महेंद्र दळवी यांच्या कॅशबॉम्बचा मोठा बोलबाला ऐन हिवाळी अधिवेशनात झाला होता. त्याअनुषंगाने आमदार दळवी यांना माध्यमांनी छेडले असता, आमदार दळवी म्हणाले, त्यांनी सुपारी देवून फोडलेले कॅशबॉम्ब हे फुसके निघाले आहेत. मात्र आता मी जो बाँम्ब फोडणार आहे, तो फोडल्यावर तटकरे रोहा सोडून, महाराष्ट्र सोडून थेट विदेशात पळून जातील. परंतु माझ्यावर संस्कार आहेत. संस्कृती आहे. त्यांना उतरती कळा लागली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदा बाबत बोलताना आमदार दळवी म्हणाले , त्या बाबत उपमुख्यमंत्री अजितदादांचे जे स्टेटमेंट आहे ते दिशादर्शक निश्चित आहे. येणाऱ्या काळात आम्हाला भरतशेठ गोगावले यांच्या रुपाने पालकमंत्री मिळेल, असा पूर्ण विश्वास आहे. रायगडची रखडलेली विकास कामे मार्गी लागतील असे त्यांनी अखेरीस म्हटले आहे.
आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार तटकरे यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी, आमदार दळवी यांना सुनील तटकरे यांच्या पलिकडे काहीच दिसत नाही, असे म्हटले आहे. आ.दळवी यांना सकाळी नाष्ट्यात तटकरे, दुपारी जेवताना तटकरे, दुपारी चहाच्यावेळी तटकरे, रात्री जेवताना तटकरे आणि रात्री झोपल्यावर स्वप्नात देखील तटकरेच येतात. आणि म्हणूनच ते अशी वक्तव्ये करतात. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखे मला वाटते अशी टिका त्यांनी केली आहे. दरम्यान, उद्या निकालानंतर रायगडच्या जनतेने कोणाला स्विकारले हे आपल्याला कळेल, असे त्यांनी अखेरीस म्हटले आहे.