

Panvel Youth Swept Away
पनवेल : पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मित्रांसोबत गेलेल्या एका तरुणावर क्षणार्धात काळाने झडप घातली. ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाय घसरताच तो प्रचंड वेगाच्या प्रवाहात वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचविण्याचे आटोकाट प्रयत्न केले, मात्र पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यांच्या डोळ्यांसमोरच तो प्रवाहात अदृश्य झाला.
ही दुर्दैवी घटना पनवेल तालुक्यातील भेकरेवाडी, शिरवली गाव परिसरात मंगळवारी (दि. ७) घडली. मयूर पाटील (रा. कळंबोली, मूळ गाव–धुळे) हा पाच ते सहा मित्रांसह परिसरात फिरण्यासाठी आला होता. पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यात पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही. मात्र पाण्यात उतरताच त्याचा तोल जाऊन पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. काही क्षणांतच प्रचंड प्रवाहाने त्याला दूर वाहून नेले.
घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र अंधार आणि पाण्याचा वाढलेला वेग यामुळे शोधकार्याला यश आले नाही.
बुधवारी (दि. ८) सकाळपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशमन दल, पनवेल तालुका पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून नदीपात्रात शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आणि वेगवान प्रवाहामुळे बचाव पथकांना शोधकार्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, पावसाळ्यात धबधबे, ओढे, नद्या आणि पाण्याच्या प्रवाहात पोहण्यासाठी उतरणे किंवा सेल्फीच्या मोहापायी जीव धोक्यात घालणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.