

माणगाव: कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या चौकटीतून बाहेर पडत तेथील शेतकरी आता आधुनिक, दीर्घकालीन आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळू लागला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील ज्येष्ठ, प्रगतशील व शेतीनिष्ठ शेतकरी दत्तूशेठ पवार यांनी आपल्या वयाच्या ८६ व्या वर्षी चंदन लागवडीचा अभिनव प्रयोग हाती घेऊन या बदलाला एक नवी दिशा दिली आहे.
१९९८ मध्ये शासनाचा 'शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार मिळालेल्या पवार यांनी आपल्या सुमारे सात एकर शेतीत पांढरे व लाल चंदन, सुरू आणि बारडोली जांभळाची तब्बल १० हजारांहून अधिक रोपे लावली आहेत.
वीरप्पनच्या तस्करीमुळे चंदनाचे नाव अनेक दशके काळ्या बाजाराशी आणि गुन्हेगारीशी जोडले गेले होते. मात्र, पवार यांनी त्याच चंदनाला कष्ट, शास्त्रीय पद्धती आणि आधुनिक शेतीच्या प्रयोगाशी जोडत तस्करीच्या सावलीतून बाहेर काढले आहे.
त्यांच्या शेतात २,६५० पांढऱ्या चंदनाची, २,५०० लाल चंदनाची, २,५०० सुरूची आणि ५,५०० बारडोली जातीच्या जांभळाची रोपे सुमारे १० बाय १० फूट अंतरावर लावण्यात आली आहेत. चंदनाच्या झाडांना योग्य वाढीसाठी ‘होस्ट’ (पोषक) वनस्पतीची आवश्यकता असल्याने पांढऱ्या चंदनासोबत सुरूची लागवड करण्यात आली आहे.
या प्रयोगासाठी पांढरी आणि लाल चंदनाची रोपे थेट केरळहून मागवण्यात आली. लागवडीपूर्वी मे महिन्यात दोन बाय दोन फुटांचे खड्डे खोदून, त्यात माती, शेणखत, पाव किलो कडुलिंबाची पेंड आणि १०० ग्रॅम टाटा गोल्ड पावडरचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने लागवड करण्यात आली. पांढरे चंदन १२ ते १५ वर्षांत तर लाल चंदन सुमारे २० वर्षांत विक्रीयोग्य होते.
या चंदन लागवडीतून बहुउद्देशीय उत्पन्नाचे गणित मांडण्यात आले आहे. चंदन वाढीच्या काळात त्याच जमिनीत लावलेल्या बारडोली जांभळाची फळे ४ वर्षांनंतर विक्रीस उपलब्ध होतील. त्यामुळे पुढील १५ वर्षे मशागतीचा खर्च निघून शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळत राहील.
सध्याच्या बाजारभावानुसार, पांढऱ्या चंदनाचा गाभा १० ते १४ हजार रुपये प्रति किलो आणि लाल चंदन सुमारे ५ हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होऊ शकते. या अंदाजानुसार भविष्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि भातशेतीतून मिळणारे मर्यादित उत्पन्न यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी दत्तूशेठ पवार यांचा हा प्रयोग अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी दाखवलेली ही भविष्यवेधी दृष्टी आणि प्रयोगशीलता कोकणच्या कृषी जगताला समृद्धीची नवी वाट दाखवणारी ठरत आहे.