

पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरात वाहन तपासणीची कारवाई करत असताना मोटार वाहन निरीक्षकाला धक्काबुक्की करून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याची घटना घडली असून, याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हे मोटार वाहन निरीक्षक म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना येथे कार्यरत आहेत. दरम्यान त्यांना परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांच्या आदेशानुसार सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे विशेष तपासणीसाठी नियुक्त आहेत.
१० जून २०२६ रोजी तळोजा एमआयडीसी परिसरात वाहन तपासणी मोहीम राबवित असताना वाहन क्रमांक एमएच-४६-एफ-२६४१ हे वाहन सुमारे चार टन अतिरिक्त मालवाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. वाहनाची तपासणी केली असता ३१ मार्च २०२३ नंतरचा वाहन कर भरलेला नसल्याचे आढळून आले. तसेच वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, विमा, योग्यता प्रमाणपत्र, परवाना आणि नॅशनल परमिट ऑथोरायझेशन यांसह सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची मुदत संपलेली असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत कलम १९२, १९०, १९२-अ, १७७, १९६ व १९४ अन्वये संबंधित वाहनावर ई-चलन कजारी करण्यात आले. या कारवाईअंतर्गत वाहन चालकावर एकूण ५० हजार ५०० रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले.
दरम्यान, या कारवाईचा राग मनात धरून नितीन रॉय व त्याच्यासोबत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने मोटार वाहन निरीक्षक अविनाश पाटील यांच्या शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे. दोघांनीही पाटील यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली, अश्लील शिवीगाळ केली तसेच खोट्या अॅट्रॉसिटी प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित वाहन एल.ई. कॅरीअर्स प्रा. लि. कंपनीच्या मालकीचे असतानाही "माझ्या वाहनावर चलन का केले?" असा जाब विचारत हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर अविनाश पाटील यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तळोजा पोलिसांनी एफआयआर क्रमांक ०२३९/२०२६ नोंदविला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम १३२, १२१(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळोजा पोलीस करीत आहेत.