

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिस दलाने बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशानुसार सोमवारी (दि.८) संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल ११४९ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या एकाच दिवसाच्या कारवाईत तब्बल १३ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक रित्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक जाधव यांनी अपघातांच्या आकडेवारीचा सखोल आढावा घेतला. यात बहुतांश प्राणघातक अपघात हे वाहतूक नियमांचे उल्लंघन, हेल्मेटचा वापर न करणे, भरधाव वेग, चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालविणे आणि स्टंटबाजीमुळे होत असल्याचे स्पष्ट झाले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखेने संयुक्तपणे सोमवारी रस्त्यावर उतरून ऑपरेशन क्लीन राबवले.
गतवर्षी अपघातात ५३८ नागरिकांचा मृत्यू
सन २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण ८४६ रस्ते अपघात घडले. यातील ४८१ प्राणघातक अपघातांमध्ये ५३८ नागरिकांना जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे, यात सर्वाधिक ३४२ अपघात दुचाकींचे असून ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालू वर्षी (जा-नेवारी ते मे २०२६) ३९८ अपघातांची नोंद झाली असून, यात २४० दुचाकी अपघातांमध्ये १४४ जणांचा बळी गेला आहे. हेल्मेटचा वापर न केल्याने डोक्याला मार लागून मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ओव्हरलोड वाहन तपासणी : आरटीओची मोहीम सुरू
छत्रपती संभाजीनगर : क्षमतेपेक्षा जास्त साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांविरुद्ध सर्वत्र आरटीओ कार्यालयाच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी इतर जिल्ह्यातील १२ अधिकारी शहरात दाखल झाले असून, ही मोहीम ८ ते १९ जूनपर्यंत चालणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. ओव्हरलोड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे क्षमतेपेक्षा जास्त साहित्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनाही नुकसान सहन करावे लागते.
आरटीओ कार्यलायांच्या वतीने वर्षभरात अनेकदा अशी मोहीत राबवली जाते. असे असतांनाही परिवहन विभागाच्या वतीने वर्षातून एकदा इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या पथकांकडूनही ही मोहीम राबवली जाते. याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८ ते १९ जून दरम्यान ओव्हरलोड वाहन तपासणीची विशेष मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. या मोहिमेत इतर जिल्हयातील १२ अधिकारी शहरात दाखल झाले असून त्यांनी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम जिल्हाभर राबवण्यात येत आहे.
अशी झाली कारवाई
विना हेल्मेट: ५६३
इतर कलमांनुसार कारवाई : १८४
सिग्नल तोडणे/पोलिसांचा इशारा न जुमानणे : १३२
विनापरवाना वाहन चालविणे : ८९
वाहतुकीस अडथळा निर्माण करणे : ६१
तिब्बल सीट (ट्रिपल सीट) : ५१
विना सीटबेल्ट : ३०
अतिवेगाने वाहन चालविणे : १५
धोकादायक ओव्हरटेक : १४
नियमबाह्य (फॅन्सी) नंबर प्लेट: १४
वाहन चालवताना मोबाईलचा वापर : ०८
अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे : ०१ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
येथील अधिकारी पिंप्री चिंचवडला
छत्रपती संभाजीनगर आरटीओ कार्यालयातील १२ अधिकारी पुणे येथील पिंप्री चिंचवड येथे तपासणी मोहीम राबवण्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. हे अधिकारी १९ जून पर्यंत तेथे तपासणी मोहीम राबवणार आहेत. त्या नंतर ते परतीच्या मार्गाला लागतील अशीही माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेल्मेट हे ओझे नाही, सुरक्षेचे कवच ! - 4 वाहतुकीला शिस्त लावणे आणि निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. दुचाकी चालकांनी हेल्मेटकडे केवळ दंडापासून वाचण्याचे साधन किंवा ओझे म्हणून पाहू नये, तर ते स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचे कवच आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील.
प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण)