

Raigad Police Dog
विक्रम बाबर
पनवेल : पोलिस दलात सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे नवी मुंबई पोलिस दलात स्वागत करण्यात आले आहे. विशेषतः डॉग हँडलर्समध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ ऑगस्ट रोजी पोलिस सेवेत कार्यरत श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या देखभालीसंदर्भात धोरणात्मक निर्णय जाहीर केला. त्यानुसार, दहा वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त होणाऱ्या श्वानांना यापुढे दत्तक देण्यात येणार नसून, त्यांच्या संपूर्ण आयुष्यभराची देखभाल पोलिस विभागामार्फतच केली जाणार आहे.
या निर्णयामुळे नवी मुंबई पोलिस दलातील डॉग हँडलर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. गुन्हे उकलणे, स्फोटके शोधणे, अमली पदार्थविरोधी कारवाया तसेच विविध सुरक्षा मोहिमांमध्ये अनेक वर्षे हँडलर्ससोबत काम करणारे हे श्वान त्यांच्या दृष्टीने केवळ सेवेतले सहकारी नसून कुटुंबातील सदस्यच बनतात. त्यामुळे निवृत्तीनंतर दत्तक प्रक्रियेमुळे या श्वानांपासून दूर जाण्याची वेळ हँडलर्सवर येत होती. नव्या निर्णयामुळे मात्र निवृत्तीनंतरही हे श्वान पोलिस विभागाच्या देखरेखीखाली राहणार असल्याने हँडलर्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नवी मुंबई पोलिस दलात सध्या सहा ते सात श्वान विविध सेवांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये लॅब्राडोर प्रजातीचे जॅक, सिंबा आणि रॅम्बो हे तीन श्वान महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. जॅकचे वय सध्या साडेनऊ वर्षे असून तो लवकरच निवृत्त होणार आहे. सिंबा आणि रॅम्बो हे चार ते साडेचार वर्षांचे असून ते अद्याप सक्रिय सेवेत आहेत.
सीबीडी बेलापूर येथील पोलिस आयुक्त कार्यालयाच्या गुन्हे शाखेकडे डॉबर प्रजातीचे श्वान असून त्यांना विविध जबाबदाऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच अमली पदार्थविरोधी पथकाकडे जर्मन शेफर्ड प्रजातीचा एक श्वान सेवेत आहे. तोदेखील निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे आगामी काळात निवृत्त होणाऱ्या श्वानांच्या देखभालीबाबत असलेली हँडलर्सची चिंता नव्या निर्णयामुळे दूर झाली आहे.
पोलिस श्वान आणि त्याचा हँडलर यांच्यातील नाते हे केवळ अधिकारी आणि प्राणी यांच्यातील नाते नसते. अनेक वर्षे एकत्र प्रशिक्षण, परेड, तपास मोहिमा आणि विविध ऑपरेशन्समध्ये सहभागी होताना त्यांच्यात घट्ट भावनिक नाते निर्माण होते. श्वानाच्या खाण्यापिण्यापासून आरोग्य, प्रशिक्षण आणि व्यायामापर्यंतची जबाबदारी हँडलर सांभाळतो. त्यामुळे दहा वर्षांच्या सेवाकाळात हा श्वान हँडलरच्या कुटुंबाचा अविभाज्य सदस्य बनतो.
“एकाच कुटुंबातील सदस्याप्रमाणे हे श्वान आमच्यासोबत जवळपास दहा वर्षे राहतात. दिवसभर त्यांच्या खाण्यापिण्यापासून प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असतो. त्यामुळे त्यांच्यावर मुलाप्रमाणे जीव जडतो. निवृत्तीनंतर त्यांना दत्तक देताना त्यांच्यापासून दूर होणे आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि वेदनादायी असायचे. आता सेवा संपल्यानंतरही ते पोलिस कुटुंबाचाच भाग राहणार आहेत, ही आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे,” अशी भावना नवी मुंबई पोलिस दलातील डॉग हँडलर्सनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे पोलिस दलातील श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याकडे पाहण्याचा अधिक संवेदनशील दृष्टिकोन पुढे आला आहे. देश आणि समाजाच्या सुरक्षेसाठी आयुष्याचा महत्त्वपूर्ण काळ सेवेत घालवणाऱ्या या श्वानांना निवृत्तीनंतरही पोलिस विभागाचा आधार मिळणार आहे. विशेषतः जॅकसारख्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्वानांना परिचित हँडलर्स आणि पोलिस कुटुंबाच्या सान्निध्यात राहता येणार असल्याने नवी मुंबई पोलिस दलातील डॉग हँडलर्समध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नवी मुंबई पोलिस दलातील लॅब्राडोर प्रजातीचा जॅक सध्या साडेनऊ वर्षांचा असून तो लवकरच निवृत्त होणार आहे. त्याच्यासोबत अनेक वर्षे काम केलेल्या हँडलरला निवृत्तीनंतर जॅकपासून दूर होण्याची चिंता होती. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयामुळे जॅकसारख्या निवृत्त होणाऱ्या श्वानांना दत्तक देण्याऐवजी पोलिस विभागाच्या देखरेखीखालीच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जॅकला आपल्यापासून दूर जावे लागणार नसल्याने त्याच्या हँडलरने समाधान व्यक्त केले आहे.