
उरण : राजकुमार भगत
रायगड जिल्ह्यात भात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. भात शेतीला पोषक वातावरण आणि पाऊस पडत असल्याने भात शेती बहरली आहे. मात्र उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील हजारो हेक्टर भात शेतीवर तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी राज्य सरकार बुलडोझर फिरवण्याचा घाट घातलत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांमधील सुपीक जमीन राज्य सरकार एमएमआरडीएच्या 'तिसरी मुंबई' (कर्नाळा-साई-चिरनेर नवनगर) प्रकल्पाच्या उभारणीसाठी संपादित करण्याचा प्रयत्न करत आहे.त्यामुळे या तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवून आपल्या शेत जमीनीवर भात शेतीची लागवड केली आहे.
एकंदरीत सुपीक जमिनीचे नुकसान : उरण, पनवेल आणि पेणमधील हजारो एकर बागायती व शेतजमीन उद्ध्वस्त होऊन स्थानिक संस्कृती संपुष्टात येऊन येथील आगरी, कोळी व कराडी समाजाचे अस्तित्व संपुष्टात येऊन, उपजीविकेचे साधन नष्ट होणार असल्याने आज जरी भात शेती जोमाने बहरत असली तरी राज्य सरकार लादत असलेल्या तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.