

रायगड : रायगड जिल्ह्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व नगरपालिका निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील. सध्या ठिकठिकाणीच्या जागा वाटपाबाबत आघाडीतील घटक पक्षांची चर्चा सुरू आहे, अशी माहिती ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पक्षाच्या अलिबाग संपर्क कार्यालयात शनिवारी दुपारी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शहर प्रमुख संदीप पालकर, सतीश पाटील, तनुजा पेरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अलिबाग नगर परिषदेसह जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद निवडणुकांच्या पक्षाच्या तयारी संदर्भात भोईर यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुका या आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जातील. जागा वाटपाबाबत सध्या आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवून न.पां.वर सत्ता काबिज करण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे आघाडीतर्फे सक्षम उमेदवार देण्यात येतील. आघाडीत तडजोड करावी लागते, त्यामुळे जिथे आघाडीच्या माध्यमातून लढणे शक्य नाही तेथे स्वबळावर लढण्याची पक्षाची तयारी आहे. याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, मात्र ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्यांना दूर ठेवले जाईल, असे भोईर म्हणाले.
अलिबागमध्ये शेकापसमवेत चर्चा
अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सुरू आहे. अलिबागमध्ये नऊ ते दहाजण इच्छुक आहेत. येथेही शेकाप बरोबर चर्चा सुरू असून यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास जिल्हा संपर्कप्रमुख सुरेंद्र मात्रे यांनी यावेळी व्यक्त केला. अलिबागमध्ये आम्ही तीन ते चार जागांसाठी आग्रही आहोत असेही सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.